Nagpur News : नागपूर शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे (NMC) विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत हत्तीरोगग्रस्त रुग्णांसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या पादत्राणांचे वितरण करण्यात आले. यावेळी महापालिकेचे आयुक्त (Nagpur Municipal Corporation Commissioner) राधाकृष्णन बी. यांनी स्वतः रुग्णांना पादत्राणे परिधान करुन दिले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असून, लोकसहभागाने हत्तीरोगमुक्त नागपूर साकारता येईल असा विश्वास व्यक्त करत राधाकृष्णन बी. यांनी हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणे वितरण करणारा राज्यातील पहिल्या अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

  


मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेतर्फे मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे MMDP क्लिनिक (Morbidity Management and Disability Prevention)/ हत्तीरोग व्यवस्थापन केंद्र सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MMDP क्लिनिक सुरु करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. याशिवाय हत्तीरोग आजाराविषयी आणि त्यापासून बचावासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक गोळ्यांच्या संदर्भात जनजागृती केली जात असल्याचे सांगितले.


आयुक्त पुढे म्हणाले की, हत्तीरोग हा जीवघेणा आजार नसला तरी यामुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते. मनापातर्फे राबवण्यात येणाऱ्या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेला मिळालेल्या सहकार्यामुळे शहरातील काही भाग हत्तीरोगमुक्त झालेला आहे. मात्र अजूनही काही भागांमध्ये या आजाराचा प्रभाव दिसून येतो. तरी संपूर्ण शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन सारख्या संस्थांनी अशा मानव कल्याण उपक्रमासाठी पुढे येणे ही अत्यंत चांगली बाब असून, इतरही संस्थांनी याचे अनुकरण करुन नागपूर शहराला सुदृढ बनवण्यात सहकार्य करावं, असं आवाहनही राधाकृष्णन बी. यांनी केलं. असं झाल्यास नागपूर महानगरपालिका आरोग्य क्षेत्रात 2025 पर्यंत नक्कीच पुढे जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय असा लोकोपयोगी उपक्रम दिलेल्या मुदतीच्या आधी सुरु करणाऱ्या हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांचे अभिनंदनही राधाकृष्णन बी. यांनी केले.


नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर (rotary club nagpur) डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणांचे वितरण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. मनापा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहा. सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग) डॉ. निमगडे, WHO समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी, रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनचे अध्यक्ष डॉ. विकास इंगळे, विवेक देशपांडे, पात्रीकर यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.


वैद्यकीय उपचारांपलीकडे जाऊन काळजी घ्या


कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांनी केले. त्या म्हणाले की, हत्तीरोगग्रस्त रुग्णांची संख्या ही चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांपैकी अधिक आहे. सध्या नागपुरात हत्तीरोगाचे 837 रुग्ण आहेत. त्यापैकी 100 अत्यंत गरजू रुग्णांना रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनच्या वतीने विशेष पादत्राणे देण्यात आले आहेत. सर्वप्रथम 25 रुग्णांना हे पादत्राणे वितरित करण्यात आले असून, अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी नागपूर महानगरपालिका राज्यातील प्रथम महानगरपालिका ठरली आहे. या प्रकल्पासाठी 'वैद्यकीय उपचारांपलीकडे जाऊन काळजी घेणे' ही संकल्पना निश्चित करण्यात आली असल्याचे डॉ. जास्मीन मुलानी यांनी सांगितले.


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Governor : राज्यपाल दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा