पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील शाळा गेल्या आठ महिन्यापासून बंद होत्या. परिणामी शाळांमधून मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण व्यवस्था लाखो मुलांना देण्यात येत आहे. मात्र, ज्यांना रोज खायची भ्रांत अशा गोरगरीब मुलांना कुठली आलीय शाळा आणि कुठलं आलंय ऑनलाईन शिक्षण. पण कोरोनाकाळात गोरगरिबांच्या पोटीची सोय करणाऱ्या रॉबिन हूड आर्मीने अशा गरीब आणि गरजू मुलांनी मोलमजुरीकडे व गुन्हेगारीकडे न वळता शिक्षणाचे धडे गिरवावेत यासाठी एक प्रयोग सुरु केला आहे.
पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासमोर असलेल्या नवजीवन अपंग शाळेच्या मोकळ्या आकाशात ही बिनभिंतीची शाळा भरते. आता विद्यार्थ्यांची संख्या 35 असली तरी रोज यात भरच पडत चालली आहे. या परिसरातील झोपडपट्टीतील ही लहान मुले पडेल ते काम करीत भटकत असायची. रॉबिनहूडच्या तरुणांनी यांच्या पालकांना सांगून त्यांना या शाळेकडे वळवले. या ठिकाणी या मुलांना शिकवायला मग श्रेया भोसले, अमृता शेळके, कीर्ती मोरे अशा तरुणी स्वतः पुढे आल्या आणि त्यांनी या मुलांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली.
यातील श्रेया भोसले ही एमएससी फिजिक्स शिकलेली असून ती भाऊराव पाटील कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे. तिला रॉबिनहूडकडून होत असलेले हे प्रयत्न दिसल्यावर तिने या मुलांना शिकवायला येण्यास सुरुवात केली. तिच्या मदतीला वकिलीचे शिक्षण घेत असलेली कीर्ती मोरे आणि इंजिनियरिंगचे शिक्षण घेणारी अमृता शेळके याही पुढे आल्या आणि खऱ्या अर्थाने या शाळेतील मुलांना शिक्षणाचे धडे मिळण्यास सुरुवात झाली. या मुलांना शाळेचा गणवेश, वह्या, पुस्तके, दफ्तर देण्यात आले आहे. आता मजुरीकडे आणि गुन्हेगारीच्या मार्गाला जाऊ शकणारे त्यांचे हात ABCD गिरवू लागले आहेत.
मराठी व इंग्रजी कविता, अंकगणितांची या मुलांना चांगलीच गोडी लागली आहे. ऑनलाईन शिक्षण घेणारी मुले घरी बसून महागड्या मोबाईलवर शिक्षणाचे धडे गिरवत असताना ही गोरगरीब चिमुरडी मोकळ्या आकाशाखाली त्यांच्या शिक्षक दीदींकडून शिक्षण घेत आहेत. अशा मुलांची संख्या पंढरपुरात मोठ्या प्रमाणात असून त्यांना शिक्षणाची दिशा दाखवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व अमृता सारख्या स्वयंसेवक पुढे आल्या तर ही मुले देखील शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील होताना दिसतील. आता अशा मुलांना शाळेची वाट दाखवायला रॉबिनहूड आर्मी करीत असलेल्या प्रयत्नाला समाजाच्या साथीची गरज आहे.