सातारा : पळून जाऊन लग्न केल्याचं तुम्ही ऐकलं असेलं, मात्र साताऱ्यात एका जोडप्याने सगळ्यांच्या संमतीने पळत-पळत लग्न केलं आहे. नवरा-नवरीसह वऱ्हाडी मंडळी तब्बल 25 किलोमीटर धावत जाऊन, विवाह नोंदनी कार्यालयात रजिस्टर पद्धतीने आगळं-वेगळं लग्न केलं.


साताऱ्याच्या मेढा तालुक्यातील धावपटू नवनाथ डिगे आणि पुनम चिकणे यांनी आपला विवाह धावत करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय कुटुंबानेही मान्य केला.

लग्नाच्या दिवशी सकाळी सहा वाजता फ्लॅग ऑफ झाला आणि नवरा-नवरीसह वऱ्हाडाने धावण्यास सुरुवात केली. थोडा अंधार होता, पण गाडीच्या प्रकाशात ही सर्व मंडळी सातारच्या दिशेने धावत सुटली. यात लहान मुलांपासुन ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश होता.
या लग्नाची चर्चा संपूर्ण जावली तालुक्यात पसरली होती. हे अनोखं लग्न पाहण्यासाठी रस्त्याने नागरिकांनी गर्दी केली होती.  मेढा ते सातारा असा प्रवास करताना प्रत्येक गावाच्या वेशीवर ग्रामस्थ मंडळी नवरा-नवरीचं स्वागत करायला सज्ज होती. कोण औक्षण करत होतं तर कोणी फटाक्यांची माळ लावून त्यांचं स्वागत करत होतं.


तीन तास धावल्यानंतर अखेर साताऱ्याच्या विवाह नोंदणी कार्यालयात वऱ्हाडासह नवरा-नवरी दाखल झाले. इथले अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्वत: नवरा-नवरीच्या स्वागतासाठी उभे होतं. दरवाजात भलीमोठी रांगोळी रेखाटून आणि फूल देऊन त्यांनी नवनाथ आणि पूनमचं स्वागत केलं. त्यानंतर या जोडप्याचा विवाह संपन्न झाला.