औरंगाबाद : इंटरनेटशिवाय आता सगळंच अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळेच अनेक शहरं मोफत वायफायनं जोडली जात आहेत. मात्र ही सुविधा आता औरंगाबादेतील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.


 
मोबाईलमध्ये तोंडू घालून बसणारं तरुणांचं एक टोळकं परिसरातील रहिवाशांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. औरंगाबादमधील हार्ट ऑफ सिटी अशी ओळख असलेल्या कॅनॉटप्लेस भागातील हा प्रकार.

 
मोबाईल कंपनीनं इथं मोफत फोर जी वायफाय सेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी शेकडो तरुण इथं रात्रंदिवस ठाण मांडून असतात. एक टोळकं मोठ्या आवाजात पॉर्न साईट बघतं. त्यामुळे परिसरातील लोकांना नाहक त्रास होत आहे.

 
या त्रासामुळे तर तरुणींवर इथला बस स्टॉप बदलण्याची वेळ आली आहे. कारण रात्रंदिवस तरुणांचं हे टोळकं इथं असतं. मग सिगरेटचा धूर, मोठ-मोठ्या आवाजात धांडगधिंगा, बर्थ डे सेलिब्रेशन असे अनेक प्रकार इथे नित्याचे झाले आहेत. त्यामुळे 40 टक्के लोकांनी घरं सोडली तर 30 टक्के लोकांनी विक्रीला काढली आहेत.

 
चकटफू वायफायसाठी आलेल्या टोळक्यामुळे महिलांचा मॉर्निंग वॉक बंद झाला आहे. लोकांनी पोलिसात तक्रार केली. काही दिवस पोलीस आले. पण आता परिस्थिती जैसे थे आहे.

 
खरं तर सध्या मोबाईलचं युग आहे. एका क्लिकवर वायफायमुळे ज्ञानाचे जाळं मोबाईलवर उपलब्ध होतोय. फोर जी मुळे त्याला वेग आला आहे. संपूर्ण औरंगाबादमध्ये अजून वायफायची मोफत सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी तरुणांचा घोळका जमतो आणि परिसरातल्या लोकांना त्रास होतो. त्यावर तातडीनं उपाय करणं आवश्यक आहे.