नांदेड : विवाह सोहळा हा प्रत्येकांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण,हा सोहळा भव्यदिव्य व्हावा असे सर्वांना वाटते.सोहळ्यात,मौजमजा, विविध अन्न  पदार्थ,मोठा लग्न मंडप, एखाद्या ऐतिहासिक स्थळाचा देखावा उभा करणे ,हाजारों पाहुणे मित्रमंडळींची उपस्थित यांवर भर दिला जातो.पण या सर्व गोष्टींना फाटा देत आपल्या अन्नदात्या विषयी कृतज्ञता म्हणून आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा देत पुण्यातील डॉ मिलिंद भोई यांनी  आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलेला सुंदर असे घर  बांधून देण्याचा संकल्प केलाय. हा संकल्प लवकरच पूर्ण होणार असुन लवकरच नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. अर्धापुर शहरातील कृष्णा नगर परिसरात हे घर बांधण्यात येत असून  बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.


अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुण्यातील शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुण्यजागर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती देण्यात येते.तसेच पुण्यातील विविध कुटुंबात दहा दिवस या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना घेऊन दिवाळी साजरी करण्यात येते.तसेच या प्रतिष्ठाण कडून असे कुटुंब सुशिक्षित व आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला जातोय.या प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.


भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांच्या गायत्री या लाडक्या लेकीच्या लग्नाची एकीकडे तयारी सुरू झाली, तर दुसरीकडे अर्धापूर शहरातील लक्ष्मी साखरे यांच्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करून बांधकाम अंतिम टप्प्यात कसे जाईल याची काळजी घेतली जात होती.शहरातील अहिल्यादेवी नगरांत राहणाऱ्या लक्ष्मी साखरे यांच्या पतीने नापिकी‌‌ व कर्ज बाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती.त्यांना दोन छोट्या मुली व एक मुलगा आहे.अत्याल्प शेती, घरात कर्ता पुरुष नाही, अडचणींचा डोंगर, पाल्यांचे शिक्षण आदी अडचणीतून हे कुटुंब मार्ग काढत असताना त्यांच्या मदतीला भोई प्रतिष्ठान धावून आले.


डोक्यावर आपल्या हक्काची छत असावं हे प्रत्येकाचे स्वप्न,पण हे स्वप्न साकार होतेच असे नाही. तसेच घरी कर्ता पुरुष नसला की आणखीन अवघड होते.अशा विविध विवंचनेत असणाऱ्या या शेतकरी कुटुंबाला मायेचा ओलावा, डॉ मिलिंद भोई यांनी देवून लक्ष्मी साखरे यांच्या घराचे स्वप्न साकार केलेय.डाॅ मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री हिचा विवाह सोहळा शनिवारी 22 जानेवारी रोजी पूण्यात ऋषिकेश गोसावी यांच्याशी संपन्न होणार आहे.तर या नवदाम्पत्याच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा पूढील महिन्यात संपन्न होणार आहे. 


आपल्या अन्नदात्यां विषयी कृतज्ञता ठेवणें हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.शेतकरी आपल्या अन्नदाता.शेतकरी कुटुंबात अडचणी येतात.हा अडचणीत सापडलेला शेतकरी टोकाचा निर्णय घेतो.ही वेळ कोणत्याही कुटुंबावर येवू नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.या सामाजिक जाणीवेतून डॉ. भोई यांनी हा संकल्प केलाय आणि तो पूर्ण होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Unseasonal Rains : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; 23 आणि 24 जानेवारीला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा


50 फुट खोल विहिरीत पडलेल्या साळींदरला वाचवण्याचा थरार; प्राणीमित्रांनी रॅपलिंग करून दिले जीवदान


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha