पुणे : राज्याचा आरोग्य विभाग सध्या सीमेवरच्या जवानांप्रमाणे सावध झाला आहे. कारण स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं वर काढलं आहे. एकट्या पुण्यात आतापर्यंत 31 रुग्णांचा जीव गेलाय, तर 23 जण व्हेंटिलेटरवर आहेत.


त्यामुळे स्वाईन फ्लूशी दोन हात कसे करायचे, याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज पुण्यात कार्यशाळाही झाली.

राज्यात स्वाईन फ्लूची दहशत

राज्यात गेल्या 4 महिन्यात स्वाईन फ्लूने 97 जणांचा जीव घेतला आहे. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे स्वाईन फ्लूने पुन्हा उचल खाल्ली आहे. राज्यभरातील रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूच्या पेशंटची गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालंय.

एरवी थंडी-ताप आल्यानंतर आपण त्याकडं गांभीर्याने लक्ष देत नाही. पण तसं करणं धोकायदायक ठरु शकतं. कारण थंडी वाजून येणं, 100 पेक्षा जास्त ताप येणं, सर्दी, खोकला होणं, घसा दुखणं किंवा खवखवणं, अंगदुखी किंवा पोटदुखी ही सगळी स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. ज्यावर लस किंवा टॅमी फ्लूच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात.

स्वाईन फ्लूचा वाढता प्रभाव

साधारणत: पाच वर्षांनी स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढतो, असं निरीक्षण आहे. पण आता ट्रेंड बदलताना दिसतोय.

  • कारण 2013 मध्ये स्वाईन फ्लूचे 643 रुग्ण ज्यातील 149 जणांचा मृत्यू झाला

  • 2014 मध्ये 115 रुग्ण आढळले, ज्यात 43 जणांना जीव गमवावा लागला

  • 2015 मध्ये 8 हजार 583 रुग्ण पॉझिटिव्ह होते, त्यातील 905 जण मृत्युमुखी पडले

  • 2016 मध्ये 82 पैकी 26 रुग्णांचा जीव गेला

  • तर गेल्या 4 महिन्यात 493 रुग्णांपैकी 97 जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर आणि नर्स यांनीही काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.


2009 मध्ये स्वाईन फ्लूच्या औषधांना निष्प्रभ करण्याची शक्ती विषाणूंमध्ये निर्माण झाली. त्यामुळे गरोदर स्त्रिया आणि इतर रुग्णांना मोठा धोका आहे. त्यामुळे स्वच्छता राखून आजारपणाची लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचं थैमान

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिकमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन महिन्यात जिल्ह्यात तब्बल 23 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. यातील 18 रुग्ण खाजगी तर 5 रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात दगावले.

दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात 6 रुग्णांवर तर खाजगी रुग्णालयात 28 रुग्णांवर, म्हणजे जिल्ह्यात 34 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.

एकूण जिल्ह्यात 123 रुग्ण संशयित असून आत्तापर्यंत 42 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचं जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत सांगण्यात आलं आहे.