Marathi Sahitya Sammelan : लातूर येथील उदगीर येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (95 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) आज सांगता झाली. संमेलनाचा समारोप सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागरळकर, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार रमेश कराड यांच्यासह संमेलनाअध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो, कौतिकराव ठाले-पाटील उपस्थित होते.
उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 22 ते 24 एप्रिल दरम्यान 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनासाठी देशभरातून साहित्यिक, लेखक आणि रसिकांनी हजेरी लावली. 155 लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन यावेळी झाले. तर संमेलनात 216 बुकस्टॉल लागले होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "साहित्याच्या व्यासपीठावरून राजकारण होता कामा नये. राजकीय विचारांचा रंग देऊन यात मिश्रण करण्याची आवश्यकता नाही. राजकारणात साहित्यिकाला खूप मोठे महत्त्व आहे. राष्ट्रनिर्मिती करण्याचे आणि राष्ट्र घडवण्याचे काम उत्तम साहित्यिक करू शकतो. राजकारणात साहित्य आणि संस्कृती समजणारा राजकारणी असेल तर तो उत्तम काम करू शकेल. त्या अनुषंगाने काही गोष्टी योजना तो राबवू शकतो. परंतु, आता समस्या अशी आहे की प्रत्येक क्षेत्रात काही चांगल्या आणि काही वाईट बाबी आहेत. शिक्षण संस्था या अनेक राजकारणी लोकांच्या आहेत. मात्र, या शिक्षण संस्थांमधील शिक्षणातून देण्यात येणारे विचार हे राजकाण्यांच्या विचारावर आधारित नसावेत.
लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. अमित देशमुख म्हणाले, "भारत, चीन, आसाम आणि इतर भागातील सीमांचे प्रश्न मिटत आहेत. तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न देखील चर्चेमधून सुटू शकतो. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांनी एकत्र येत हा प्रश्न मिटवावा.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यावेळी म्हणाले, माझ्या कार्यकाळात हा सोहळा होत आहे, ही मला गर्व देणारी बाब आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात झालेले काम आणि सध्या होत असलेले काम खूप मोठे आहे. त्यांनी फक्त रस्ते जोडले नाहीतर मने देखील जोडली आहेत. "
बेळगाव आणि कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यावर विचार झाला, विचारमंथन झाले, परंतु, मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. असे मत शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या