धुळे : विविध कारणं देऊन विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र शेतात मजुरीला जाण्यासाठी शिक्षकांकडे परवानगी मागणाऱ्या विद्यार्थ्याचं उदाहरण ऐकून तुम्हीलाही आश्चर्य वाटेल. तिसरीतील विद्यार्थिनीने मजुरीला जाण्यासाठी सुट्टी देण्याबाबत शिक्षकांना पत्र पाठवलं. हे पत्र वाचून शिक्षकही सुन्न झाले.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोंडले गावातील ही घटना आहे. आदिवासी वसाहतीत राहणारी रेणू महादू ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकते. हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची शाळेत ओळख आहे.
''घरात कमावतं कोणी नाही, वडील महिनाभरापासून गायब आहेत. एकटी आई काबाडकष्ट करते, मात्र त्यातून मिळणाऱ्या पैशाने आम्ही दोन बहिणी एक भाऊ आणि स्वतः आई अशा चार जणांचं कसं भागणार? म्हणून मजुरीच्या कामात हातभार लावून दोन पैसे आईला देऊन आईवर येणारा भार हलका करण्यासाठी सुट्टी द्यावी'', असं पत्र रेणूने शाळेला लिहिलं.
सध्या कापूस काढणीचा हंगाम सुरु आहे. सहा तास कापूस तोडणी केल्यास दोनशे रुपये मिळतात. दोन दिवसाचे चारशे रुपये होतात. हा विचार करून रेणू देखील शनिवार, रविवार तसेच इतर दिवशी जसा वेळ मिळेल त्या पध्दतीने आईला कामात हातभार लावते.
रेणू तिसरीत शिकते. वय वर्षे नऊ. या वयात कुटुंबाविषयीची तिची जाण पाहून शिक्षकही भारावले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गायकवाड यांनी रेणूने लिहलेलं ते पत्र सोशल मीडियावर शेअर केलं. हे पत्र वाचून शिंदखेडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुनीता गायकवाड यांनी दिली.