6th July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. या दिवसातील घडामोडी महत्त्वाच्या असतात. आजच्या दिवशी भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन झाले. त्यांनी विजेशी संबंधित नवीन शोध लावले. त्यांचा ओहमचा नियम प्रसिद्ध आहे. तर, हिंदू महासभेचे नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. मराठी साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांचीही आज जयंती आहे. तर, भारतातील यशस्वी उद्योजक धीरुभाई अंबानी यांचा आज स्मृतीदिन आहे.
1854: जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन
जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ जॉर्ज ओहम यांचा आज स्मृतीदिन. शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन संशोधकांने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे. कोणत्याही डीसी इलेक्ट्रिकल सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातील संबंध सर्वप्रथम जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओम यांनी शोधून काढले. विजेशी संबंधित असलेले नवीन शोध त्यांनी लावले होते.
1901: जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा जन्म
भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक समजले जाणारे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा आज जन्मदिन. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले. 1939 मध्ये त्यांनी हिंदू महासभेचे सदस्यत्व स्वीकारले. डॉ. मुखर्जी हे 1943 ते 1946 या कालावधी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. हिंदू महासभेचे नेते असताना हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांनी सिंध आणि वायव्य सीमा प्रांतात युतीचे सरकार स्थापन केले होते. बंगाल प्रांतातील हिंदू बहुल भाग हा भारतात राहवा यासाठी त्यांनी 1946 मध्ये बंगाल प्रांताच्या फाळणीची मागणी केली.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी होती. 1951 मध्ये त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम 370 चा विरोध केला होता. 1953 मध्ये त्यांनी विना परमिट जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
1917 : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना
भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आली.
पुणे शहरात असणारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची संशोधन संस्था आहे. या संस्थेत अंदाजे एक लाख 25 हजार प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच 29,510 हस्तलिखिते या संस्थेत जतन करण्यात आली आहेत.
पहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. 6 जुलै 1917 रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली.
1927 : लेखक, चित्रकार व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत. त्यांचा जन्म सांगलीतील माडगूळ येथे झाला.
1949 साली प्रकाशित झालेला 'माणदेशी' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले. वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (1951), हस्ताचा पाऊस (1953), सीताराम एकनाथ (1951), काळी आई (1954), जांभळीचे दिवस (1957) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (1955), वावटळ (1964), पुढचं पाऊल (1950), कोवळे दिवस (1979), करुणाष्टक (1982), आणि सत्तांतर (1982), ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.
व्यंकटेश माडगूळकर हे 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. 'पुढचं पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.
1986: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन
बाबू जगजीवन राम हे मूळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. बाबू जगजीवन राम यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. काँग्रेसशी त्यांचा संबंध स्वातंत्र्य लढ्यापासूनच होता. सर्वाधिक काळ केंद्रीय मंत्री राहण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांनी 1947 ते 1980 या कालावधीत केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली. बाबू जनजीवन राम हे भारताचे माजी उप पंतप्रधान होते. या पदापर्यंत पोहचणारे ते अनुसूचित जातीमधील पहिले राजकीय व्यक्ती होते. रेल्वे मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी रेल्वेचे जाळं आणखी मजबूत उभारण्यावर भर दिला होता. 1956-1962 या कालावधीत रेल्वे मंत्री असताना रेल्वेची अनेक कामे झाली. या दरम्यानच्या पाच वर्षात एकदाही रेल्वे दरवाढ झाली नव्हती.
1969 मध्ये जगजीवन राम हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या काळात पक्ष अधिक मजबूत झाला. आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात भूमिका घेत काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यांनी काँग्रेस फॉर डेमोक्रॅसी हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. 1977 मधील निवडणुकीत त्यांना जनता पक्षाच्या सरकारमध्ये स्थान मिळाले. त्यांनी संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळाली. पुढे 1979 मध्ये ते उपपंतप्रधान झाले. 1980 मध्ये जनता पक्षात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस(जे) पक्ष स्थापन केला.
2002: उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे निधन
धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा आज स्मृती दिन. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला केला.
1949 साली आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणाऱ्या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. धीरूभाई त्यांचे वडीलबंधू रमणिकलाल यांच्यासह एडनमध्ये राहत. गुजराती लोकांची आवडनिवड या दोघा भावांना माहीत असल्याने त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले.आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई ए. बेस मध्ये कारकून ते सेल्स मॅनेजर या पायऱ्या ओलांडून गेले.
1959 साली धीरूभाई यांनी 15 हजार रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर मुंबई येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी (नात्याने दूरचे मामा) यांच्यासह भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले (मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ.) आणि रेयॉन कापडाचा व्यवसाय करू लागले.
1966 साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरुवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. 1971 साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चढू लागले.
1977 साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे 58 हजार लोकांनी आपले पैसे गुंतविले. 1978 साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरुवात केली.
1999-2000 मध्ये रिलायन्सने 25 हजार कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. 2000 साली 25 हजार कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंनी आपला दबदबा सर्वत्र निर्माण केला होता.
इतर महत्त्वाच्या घडामोडी:
1785: डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
1892: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.
1947: रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
1997: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन.