लातूर : महिला सक्षमीकरणाचं पाऊल म्हणून राज्य सरकारनं एसटीमध्ये वाहकपदावर महिलांची भरती केली. त्यामुळे अनेक महिलां रोजगार मिळाला. पण त्यातून एक धक्कादाय प्रकारही पुढे आला आहे. कारण एका सर्वेक्षणानुसार एसटीत वाहक म्हणून काम करणाऱ्या 62 टक्के महिलांचा गर्भपात झाल्याचं समोर आलंय.


आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य एसटी संघटनेच्या महिला संघटक शीला नाईकवाडी एसटीच्या सेवेत दाखल झाल्या. तेव्हापासून त्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहेत. त्यांनी संघटनेच्या वतीने 2016 साली 4 हजार 354 महिला वाहकांची 10 प्रश्नांची प्रश्नावली भरुन घेतली. त्यातल्या 410 वाहकांच्या उत्तरांचं विश्लेषण केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार 410 पैकी 62 टक्के म्हणजे 248 महिला वाहकांचा गर्भपात झाला आहे. त्यापैकी काही महिलांचं म्हणणं संघटनेनं व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन ठेवलाय. या मार्फत गर्भपात होण्याची कारणं नोंदवली गेली आहेत.

राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे एसटी महामंडळातही सहा महिने प्रसुती रजा आहे. प्रसुतीच्या आधी 3 महिने किंवा नंतर 3 महिने रजा घेता येते. परंतु जन्मानंतर बाळाला अधिक वेळ देता यावा, यासाठी महिला वाहक सातव्या-आठव्या महिन्यापर्यंत काम करतात.

एसटीत महिला वाहकांची संख्या मोठी आहे. तरीही एसटीनं त्यांच्यासाठी कुठल्याच उपाययोजना केल्या नाहीत. कुठंही महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष नाहीत. गरोदरपणात महिला वाहकांना रिक्त असलेल्या लिपिकांच्या जागेवरही काम देता येऊ शकतं. पण त्यासाठी मंत्रीमहोदयांनी संवेदनशीलपणे नव्यानं विचार करायला हवा.