5th June in History: जून महिना सुरू झाला आहे. दरम्यान, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे.जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात आजच्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे, हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, तर भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक समजले जाणारे नारायण मल्हार जोशी यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. जाणून घेऊयात 5 जूनचे दिनविशेष सविस्तर...
जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day)
जागतिक पर्यावरण दिन हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
1881 : हार्मोनियम वादक, अभिनेते आणि संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार गोविंदराव टेंबे यांचा जन्म.
गोविंदराव सदाशिव टेंबे हे प्रख्यात महाराष्ट्रीय हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, गायक, नट आणि साहित्यिक होते. त्यांचा जन्म सांगवडे, जि. कोल्हापूर येथे झाला. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती.
1879: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1955)
भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक असणारे नारायण मल्हार जोशी अर्थात ना.म. जोशी यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. 1901-1910 या काळात अहमदनगर आणि पुणे येथे खाजगी शाळांमधून, तर मुंबई आणि रत्नागिरी येथील शासकीय विद्यालयांमधून त्यांनी अध्यापन केले. हा अध्यापनाचा अनुभव जोशींना 1922-47 या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी आणि औद्योगिक कामगारांकरिता प्रशिक्षणवर्ग चालवण्यास फार उपयोगी पडला.
समाजसेवेच्या इच्छेने 1909 मध्ये जोशी ‘भारतसेवक समाज’ या संस्थेचे सदस्य झाले. संस्थेच्या ज्ञानप्रकाश या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 1911 मध्ये ज्ञानप्रकाशाची मुंबई आवृत्ती काढावयाचे ठरल्यामुळे जोशींना मुंबईत राहणे भाग पडले. तेव्हापासून अखेरपर्यंत ते मुंबईतच राहिले. 1911 मध्येच त्यांनी ‘सामाजिक सेवा संघ’ (सोशल सर्व्हिस लीग) ही संस्था स्थापिली. या संस्थेच्या कार्याशी विविध नात्यांनी ते 1955 पर्यंत निगडीत होते.
जोशींनी 31 ऑक्टोबर 1920 साली ‘अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यास मदत केली, 1929 पर्यंत ते तिचे कार्यवाहकही होते. या संघटनेमधील कम्युनिस्ट मतप्रणालीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर आपले वर्चस्व बसविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 1929 साली नागपूर येथील अधिवेशनात आयटकमध्ये फूट पडली आणि जोशींना आयटक सोडावी लागली. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यानी नंतर ‘इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ अशी निराळी संघटना काढली. पुढे 1933 मध्ये ही संघटना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर’ ह्या संघटनेत सामावण्यात येऊन नवीन संघटनेचे ‘नॅशनल ट्रेड्स युनियन फेडरेशन’ असे नाव ठेवण्यात आले. याशिवाय जोशी अनेक कामगार संघटनांशी निगडीत होते. 1926 मध्ये त्यांनी ‘टेक्स्टाइल लेबर युनियन’ ही कापडगिरणी कामगारांची संघटना स्थापिली तिचे ते अध्यक्षही होते.
‘नॅशनल सीमेन्स युनियन’ या संघटनेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. भारतीय खलाशांच्या कामाच्या स्थितीबाबत जोशींनी मोठी कळकळ व आस्था दाखवून तीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. 'भारत सेवक समाजा'मध्ये युद्धविषयक व इतर धोरणांबद्दल मतभेद झाल्यामुळे 1940 मध्ये जोशींनी समाजाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गव्हर्नर जनरलच्या वटहुकुमांना विरोध करण्याकरिता त्यांनी 1937-38 मध्ये ‘मुंबई नागरी स्वातंत्र्य संघटना’ (बाँबे सिव्हिल लिबर्टीज युनियन) स्थापन केली. या संघटनेस पंडित नेहरूंचाही पाठिंबा मिळाला.
वॉशिंग्टन येथे 1919 मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भारतीय कामगारवर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची भारत सरकारने नियुक्ती केली. अशा परिषदांच्या निमित्ताने 1922-48 या काळात जोशींनी सोळा वेळा यूरोपीय देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले, यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली.
गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारसरणीचा त्यांच्या मनावर अधिक प्रभाव होता. जात, धर्म, जन्म किंवा मालमत्ता यांवर अधिष्ठित अशा हक्कांना व भेदभावांना जोशींचा विरोध होता. आर्थिक व सामजिक समानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांवरील प्रतिस्थापित समाजरचना हे त्यांचे स्वप्न व ध्येय होते. हे ध्येय लोकशाहीवादी मार्गांनी प्राप्त करण्यावर त्यांचा अटळ विश्वास होता.
1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.
देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असंही म्हणतात. आजच्याच दिवशी आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाली होती.आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली आणि सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.
इतर महत्त्वाच्या घटना:
1915: डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
1959: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
1972: भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म.
1975 : 1967 पासून आठ वर्ष वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुएझ कालवा’ पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
1980 : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
1999: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.
2003: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान 50 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
2004: अभिनेते आणि अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन.
2022: चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळल्याने 15 लोकांचे निधन, तर 6 जखमी