कोल्हापूर: राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत असून बीडपाठोपाठ आता कोल्हापुरातही उष्माघाताचा बळी गेला आहे. कोल्हापुरातल्या शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात राहणारे 50 वर्षीय शामराव सुतार हे काल उष्माघातानं दगावले. दिवसभर फरशी बसवण्याचं काम केल्यानंतर ते रात्री कोल्हापुरातल्या शेळके पुलाच्या कट्ट्यावर बसले होते. तिथंच त्यांचा मृत्यू झाला.
वैद्यकीय तपासणीनंतर ते उष्माघातानं दगावल्याचं स्पष्ट झालं. गेल्या 6 दिवसांपासून कोल्हापूरच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सध्या इथं 38 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे.
दरम्यान, काल धुळ्यातही एसटी चालकाचा उष्माघातानं मृत्यू झाला. प्रमोद आनंदा कोळी असं या 36 वर्षीय ड्रायव्हरचं नाव आहे.
धुळे बसस्थानकात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रमोद कोळी उष्माघातानं चक्कर येऊन कोसळले. अक्कलकुवा एसटी डेपोमध्ये ते सेवा बजावत होते. चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना तातडीनं धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. धुळे शहराचं तापमान सध्या 42 अंश सेल्सिअस आहे.
संबंधित बातम्या:
धुळ्यातील एसटी चालकाचा उष्माघातानं मृत्यू
उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील शाळांच्या वेळापत्रकात बदल