परभणी : परभणीमध्ये एका गायीच्या पोटात 50 ते 55 किलो कचरा, प्लास्टिक कॅरीबॅग आणि अन्य साहित्य आढळून आलं. त्यानंतर या गायीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील, पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. तीन तास प्रयत्न करुन डॉक्टरांनी गायीचे प्राण वाचवले. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्लास्टिक कॅरीबॅग, कचरा यांचा घातक परिणाम समोर आला आहे.
परभणीमधील राधाजी वाघमारे यांनी घरातील दुधाची पूर्तता करण्यासाठी एका गायीचा सांभाळ केला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून, गायीच्या आहारात फरक पडल्याचं जाणवले. त्यातच दोन दिवसांपासून गायीने खाणंही बंद केलं होतं. त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय विभागात तिची तपासणी केली.
गायीच्या पोटात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक बॅग आढळल्याचे लक्षात आल्यावर, डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करायचं ठरवलं. त्यानंतर विद्यापीठातील ऑपरेशन थिएटरमध्ये तीन ते चार तास ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये गायीच्या पोटातून तब्बल 50 ते 55 किलो साहित्य बाहेर काढण्यात आलं, ज्यात प्लास्टिक कॅरीबॅग, वाळूचे खडे, चपला आढळून आल्या.
मोकळं सोडल्यावर गायी आणि इतर जनावरं मिळेल तिथे आणि मिळेल ते खातात. अनेकवेळा गवतासोबत कचरा, वाळूचे खडे पोटात जातात. घरात शिल्लक राहिलेला स्वयंपाक फेकून देण्यासाठीही बऱ्याच वेळा प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केला जातो. त्यामुळेही अन्नासोबत हे प्लॅस्टिक जनावरांच्या पोटात जातं. यामुळे अशा पद्धतीने कचऱ्यात अन्न टाकताना काळजी घेण्याची आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
शस्त्रक्रियेनंतर गायीची प्रकृती सुधारत असून, पुढील एका आठवड्यात गाय पूर्णपणे बरी होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
प्लास्टिक पिशव्या, चप्पल; गायीच्या पोटात 50-55 किलो कचरा आढळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2018 04:19 PM (IST)
गायीच्या पोटात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक बॅग आढळल्याचे लक्षात आल्यावर, डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करायचं ठरवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -