4th December In History :  इतिहासात प्रत्येक दिनाचे एक महत्त्व असते. आजच्या दिवसाचेही भारताच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी भारतीय नौदलाने 1971 मध्ये पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. या पराक्रमाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येतो. सामाजिकदृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी ब्रिटिशांनी भारतात सती प्रथेवर बंदी घातली. 


1829 : भारतात सती प्रथेवर बंदी 


पतीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने पतीच्या चितेत उडी मारावी, अशी सती प्रथा भारतात अनेक वर्षांपासून सुरू होती. भारतातील या कूप्रथेला संपवण्याचे श्रेय ब्रिटिश व्हाइसरॉय विल्यम बेंटिक यांना जाते. आजच्याच दिवशी चार डिसेंबर 1829 रोजी बेंटिक यांनी सती प्रथेवर बंदी घातली होती. भारतातील सर्व वाईट गोष्टींच्या विरोधात ब्रिटिश व्हाइसरॉय विल्यम बेंटिक यांनी लढा दिला होता. बेंटिक यांनी बालिका हत्या करण्याची भारतातील प्रथाही संपवली होती. सनातनी, कट्टरतावाद्यांनी ब्रिटीश सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. 


1924 : गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन


गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. 1911मध्ये राजा पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली. ही वास्तू 1924 मध्ये बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. त्याचे 16 व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बेसॉल्ट दगडांनी बांधलेली ही कमान 26 मीटर (85 फूट) उंचीची आहे.


1971 : भारतीय नौदल दिन


आज भारतीय नौदल दिन. पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 रोजी भारतीय हवाई तळांवर हल्ला केला. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतरच 1971 सालच्या युद्धाला सुरुवात झाली.  पाकिस्तानच्या या आगळीकतेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय नौदलानं ऑपरेशन त्रिशूल (ट्रायडन्ट) सुरू केलं. ऑपरेशनच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या नौदल मुख्यालय असलेल्या कराची तळाला लक्ष्य करण्यात आलं. भारतीय नौदलानं 4 डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक लष्करी विमानांचं नुकसान झाले. त्यामुळे पाकिस्तानची भारतावर बॉम्ब वर्षाव करण्याची क्षमता कमी झाली. त्यात भारताच्या नौदलाच्यावतीनं पहिल्यांदाच अॅन्टी शीप मिसाईलचा वापर करण्यात आला होता. 


भारतीय नौदलाच्या या प्रखर हल्ल्यात पाकिस्तानच्या नौदलाचं आणि कराची बंदराचं अतोनात नुकसान झालं. यामध्ये पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही, तर पाकिस्तानने कराचीमध्ये एक माइनस्वीपर, एक विनाशक, दारूगोळा आणि इंधन साठवण टाक्या घेऊन जाणारे मालवाहू जहाज गमावले. भारतीय नौदलाने गाजवलेल्या या पराक्रमाच्या स्मरणार्थ दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येतो. 


2017 : अभिनेते शशी कपूर यांचे निधन 


अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा आज स्मृतीदिन. शशी कपूर यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीवर छाप सोडली. चॉकलेट हिरो म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, त्यांनी एकाच पद्धतीच्या भूमिकांपेक्षा वैविध्य जपणाऱ्या भूमिका साकारल्या. रंगभूमीवर त्यांचे विशेष प्रेम होते. वडील पृथ्वीराज कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी पत्नी जेनिफिरसह मुंबईत पृथ्वी थिएटरची सुरुवात केली. शशी कपूर यांना पद्म पुरस्काराने आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शशी कपूर यांनी जवळपास 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी 61 सिनेमे सोलो हिरो म्हणून गाजले, तर 55 चित्रपट मल्टिस्टारर होते.


 
इतर महत्त्वाच्या घटना : 


1771: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.
1892: स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांचा जन्म.
1919: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म.
1943: मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.
1967: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.