नाशिक: केदारनाथमध्ये आलेल्या जलप्रलयाची आठवण करुन देणारी परिस्थिती दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पाहायला मिळाली. पण नाशिकमध्ये आलेला पूर नैसर्गिक आहे की मानवनिर्मित असा सवाल निर्माण झाला आहे. कारण नाशिक महापालिकेने गेल्या 24 तासात ड्रेनेजमधून तब्बल 46 टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला आहे.
या प्लॅस्टिक कचऱ्यामुळेच ड्रेनेज, नाले तुंबले आणि पूरस्थिती भयानक झाल्याचा दावा केला जात आहे.
नाशिकमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस पडला. संपूर्ण नाशिक शहर जलमय झालं होतं. घरात, दुकानांत पावसाचं पाणी शिरलं होतं. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं होतं. इतकंच काय दुचाकी, चारचाकी वाहनं अक्षरश: पाल्यापाचोळ्यासारखी वाहून जात होती.
पावसाळ्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व कामांचा डांगोरा पिटणाऱ्या महापालिकेवर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. मात्र पावसानंतरच्या 24 तासांत नालेसफाई करताना महापालिकेने ड्रेनेज, नाले, ओढ्यांमध्ये अडकलेला तब्बल 46 टन कचरा गोळा केला.
यामुळे महापौरांनी केलेला दावा खरा होता का असा सवाल निर्माण झाला आहे.
प्लॅस्टिक कचऱ्यामुळेच नाशिकमधली पूरस्थिती गंभीर झाल्याचा दावा खुद्द महापौरांनी केला होताच, पण पर्यावरणप्रेमींनीही आता हेच म्हटलं आहे.
नाशिककर दररोज 3 ते 4 टन प्लॅस्टिक कचरा टाकतात अशी महापालिकेची आकडेवारी सांगते. पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार लग्नाचं जेवण असो की दैनंदिन जीवन, 'यूज अँड थ्रो'च्या नावाखाली प्लॅस्टिक सर्रासपणे वापरलं जातंय. दीड लाख पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि अनेक टन प्लॅस्टिक पिशव्या, वस्तू रोज कचरा म्हणून नाशिककर फेकून देतात. हाच कचरा पुढे जाऊन ड्रेनेज, नाले, ओढ्यांमध्ये अडकतो आणि अतिवृष्टीच्या काळात पाण्याच्या विसर्गाला जागा न मिळाल्यानं पूरस्थिती बिकट होते.
शहरीकरणामुळे गोदावरी नदीचा गळा आवळण्यात आल्याची तक्रार वारंवार पर्यावरण प्रेमी करत आहेत. सिमेंट-क्राँकीटीकरण, बांधकामांमुळे नैसर्गिक नद्या नालेही आकूंचन पावले आहेत. सरस्वती, वाघाडी या नद्या गटारीत रुपांतरीत झाल्या आहेत. नागरी वस्ती लोकसंख्या वाढल्यावर ड्रेनेज, नाल्यांची रुंदी वाढली पाहिजे, मात्र ती कमी कमी होत चालली आहे. त्यात आता प्लॅस्टिकचा भस्मासूर उभा राहिला, तर तो नाशिकला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, ही चेतावनी या बुधवारच्या पावसानं नाशिककरांना दिली आहे.