औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोने थैमान घातलं आहे. अवघ्या सहा दिवसात जिल्ह्यातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 100 वरुन 5 हजारांवर पोहोचली आहे.


दूषित पण्याामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचं तपासणी अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर छावणी परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं परदेशी आरोग्य आधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.

सहा दिवसांत रुग्णांची संख्या 5 हजारांवर पोहोचली आहे, तर सुमारे दीड हजार जणांना सलाईन लावण्यात आली, असं छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी सांगितलं.



जुलाब, मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने नागरिकांनी उपचारासाठी सरकारी रुग्णालयात धाव घेतली. कोणाच्या चुकीमुळे नागरिकांना दूषित पाणी मिळालं, यासाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडीले यांनी दिली आहे.

गॅस्ट्रो जंतूमुळे की विषाणूमुळे?
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) चार सदस्यीय पथकाने मंगळवारी रुग्णालयाला भेट देऊन परिसरातील पाण्याचे तसंच इतर काही नमुने घेतले. तर बुधवारी काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्याची सूचना केली. याच्या अहवालातून गॅस्ट्रोचा प्रसार जंतूमुळे झाला की विषाणूमुळे, हे स्पष्ट होईल.