सांगली : राज्यातील पोलीस म्हणजे खाकीतील गुंड असून सध्या ते मोकाट झाले आहेत, असा आरोप ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी केला. तसेच पोलिसांना गोळ्याच घालायच्या असतील तर खाकीतील गुंडांवर घालाव्यात, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

सांगलीतील अनिकेत कोथळेची हत्या आणि नगरमधील शेतकरी गोळीबार घटनेवरुन खासदार शेट्टी यांनी पोलीस खात्यावर टीका केली. त्यांनी आज सांगलीमध्ये अनिकेतच्या कुटुंबाची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत  मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी अजून का लक्ष घातले नाही, असे म्हणत या प्रकरणात खाकीतील गुंडांना, वर्दीतील पोलिसांकडून अभय मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे अनिकेत खून प्रकरणाचा तपास सीआयडीऐवजी सीबीआयकडून झाला पाहिजे, अशी मागणीही यावेळी शेट्टी यांनी केली.

खाकीतील गुंडं जर मोकाट फिरु लागले, तर एक दिवशी जनताच कायदा हातात घेईल असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.

अहमदनगर जिल्ह्यातील ऊस आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी बोलताना नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु होते. मात्र पोलिसांकडून लाठीमार झाल्यानंतर शेतकऱ्यांचा संयम सुटला. पण न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. ते पाहता खाकीतील गुंड मोकाट झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळ्या घालण्याऐवजी खाकीतील गुंडांवर गोळ्या घालाव्यात असा संताप यावेळी व्यक्त केला.