वर्धा : सेल्फीच्या नादात वर्ध्याच्या महाकाली धरणात चारजण बुडाल्याची माहिती समोर येत आहे. बुडालेल्यांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तब्बल तीन तासाच्या शोध मोहिमेनंतर चौघांचेही मृतदेह शोधपथकाला मिळाले.


पावसाळ्याचा दिवसात महाकाळी धरण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यानं नागरिक मोठी गर्दी करतात. यातच आज धरणावर आठ जण मित्र मैत्रिणी चार मुलं आणि मुली हे धरणावर फिरायला आले होते.

यात पाण्यासोबत खेळण्याचा नादात हे सगळे संरक्षण भिंत ओलांडून खालच्या भागात उतरले, आणि नेमकं फोटो काढताना श्वेता नेहारे हिचा पाय घसरला. तेव्हा मुलींनी एकमेकांचे हात पकडले असल्यानं एक मागून एक असे चौघेही हे धरणात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणेदार विनोद चौधरी यांनी बोट व भोई बांधवांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली. तीन तासचा शोध मोहीमेनंतर चौघांचे मृतदेह काढण्यात पोलिसांना यश मिळालंय.

या घटनेत श्वेता नेहारेसह गौरव गुल्हाने (पुलगाव),शितल प्रधान नागपूर (हल्ली मुक्काम वर्धा), आणि सोनल नाईक (वर्धा) यांचा मृत्यू झाला. तर आशिष वाघाड़े (वर्धा), वैभव सलामे (वर्धा),  कुणाल फुलकर (वर्धा), स्नेहा पुनसे (वर्धा). हे सुद्धा सोबत होते, सुदैवाने पाण्यात न गेल्यानं ते बचावले.

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ठिकठिकाणी 7 जण बुड्याल्याची माहिती समोर येत आहे. वर्ध्यातील या घटनेशिवाय सोलापूर जिल्ह्यातील कटफळ या गावातील कासाळ ओढ्यात 3 मुलं वाहून गेली. हे तिघे जण या ओढ्यात पोहायला गेले असताना ही दुर्घटना घडली.