Mountaineers of Central Railway : मध्य रेल्वेच्या चार गिर्यारोहकांनी हिमालयातील सर्वोच्च शिखर माउंट नुन सर करत अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या पर्वतारोहण मोहिमेला 29 जुलै रोजी सुरुवात झाली होती. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त हिरवा झेंडा दाखवून माऊंट नुनवर चढाई करण्यासाठी रवाना केले होते. 21 ऑगस्ट रोजी चार जणांच्या चमूनं हिमालयातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट नुन वर यशस्वीरित्या चढाई केली. 21 ऑगस्टच्या सकाळी चार जणांच्या चमूनं माउंट नुन शिखरावर तिरंगा फडकवला. मध्य रेल्वेनं याबाबत ट्वीट केलेय.
सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या चार सदस्यीय गिर्यारोहण संघाचे नेतृत्व मुंबई विभागातील अभियांत्रिकी शाखेत कार्यरत मुख्य कार्यालय अधीक्षक हेमंत जाधव यांनी केले. त्यांच्यासोबत सेंट्रलाइज्ड इलेक्ट्रिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ठाकुर्ली येथील कार्यालय अधीक्षक संदीप मोकाशी तसेच संतोष दगडे आणि धनाजी जाधव यांचा समावेस होता. या चार जणांच्या चमूनं21 ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठ वाजता 7135 मीटर उंचीचे नुन शिखर यशस्वीरित्या पार केले. हेमंत जाधव आणि संदीप मोकाशी हे 23409 फूट उंचीचे शिखर सर करणारे पहिले भारतीय रेल्वे कर्मचारी असावेत.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी या चार जणांचे चमूचं अभिनंदन केले. ते म्हणाले की, “सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या चार गिर्यारोहकांच्या चमूने पूर्व हिमालय पर्वतरांगांतील नुन-कुन पर्वताचे सर्वोच्च शिखर माउंट नुन (7135 मीटर) यशस्वीरित्या सर केले. यांतून संघातील गिर्यारोहकांचे खरे धैर्य, दृढनिश्चय आणि हिम्मत दर्शविते. दरम्यान, मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) तथा अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (CRSA) तसेच सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (CRSA) संघ यांनी देखील या यशस्वी कामगिरीबद्दल गिर्यारोहक संघाचे अभिनंदन केले.
सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब तरुणांना ट्रेकिंग आणि किल्ल्यांचे महत्वमूल्य समजावे याकरिता महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर मोहिमेचे आयोजन करते. याव्यतिरिक्त, त्यांनी अनेक बचाव मोहिमा पार पाडल्या आहेत ज्यामध्ये त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. ही टीम आपत्ती झोनमध्ये मदत करणे, सायकलिंग मोहिमेचे नियोजन करणे आणि लोकांना सायकलिंगच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करणे यासारख्या विविध क्रियाकलापांमध्ये कार्यरत आहे.