अमरावती: नवी मुंबई आणि सोलापूरनंतर आज अमरावतीमध्ये मराठा क्रांती मूकमोर्चा निघणार आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास नेहरु मैदानावरुन या मोर्चाला सुरुवात झाली.
कोपर्डी बलात्कारातील पीडित तरुणीला आणि उरी इथं शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून, या मोर्चाला सुरुवात झाली.
कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर सुरु झालेला मराठा समाजाचा आक्रोश मूक मोर्चांच्या मार्फत समोर येतोय. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, मराठा आरक्षण द्या अशा मागण्या मराठा समाजामार्फत केल्या जात आहेत.
या मागण्यांसाठी मराठा समाजामार्फत राज्यातील बहुतेक जिल्ह्यात मोर्चे काढले जात आहेत. अमरावतीच्या मोर्चात सुमारे पाच लाख लोक सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनीसुद्धा या मोर्चासाठी कंबर कसली आहे.