मुंबई/ठाणे: मुसळधार पाऊस, पुलांवर आलेलं पाणी आणि रस्त्यांवरचे खड्डे, यामुळे मुंबई आणि परिसरात वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. त्यामुळे एरव्ही वेगाने धावणारी मुंबई कमालीची मंदावली आहे.
ठाणे, घोडबंदर आणि भिवंडी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळतेय. मुंबई- अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद असल्यानं मोठ्या गाड्यांची वाहतूक ही विविध मार्गे वळवण्यात आली आहे.
त्यामुळे काल रात्रीपासून ठाणे, भिवंडी, शिळफाटा, तसंच घोडबंदरमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. दोन आठवड्यांसाठी वर्सोवा पूल बंद करण्यात आल्यानं जवळपास वाहनांच्या 20 किमीपर्यंत लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत.
याच वाहतुकीचा थेट परिणाम मुंबई शहरात पहायला मिळतोय. कारण मुंबईतले प्रमुख महामार्ग वाहतूक कोंडीने जाम झाले आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सायन-पनवेल हायवे आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, या महत्त्वाच्या रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
इतकंच नाही, तर लिंक रोड, एलबीएस मार्ग, एसव्ही रोड या अंतर्गत रस्त्यांवरही जागोजागी वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे आजची मुंबईकरांची वाट कमालीची बिकट झाली आहे.
कोणकोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी?
*ठाणे, घोडबंदर आणि भिवंडी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी
*ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सायन-पनवेल हायवे आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड
*लिंक रोड, एलबीएस मार्ग, एसव्ही रोड या अंतर्गत रस्त्यांवरही जागोजागी वाहतुकीची कोंडी