3rd February In History : इतिहासातील प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. प्रत्येक दिवसाचे इतिहासात एक महत्त्व असते. आज बनारस हिंदू विद्यापीठाचा स्थापना दिन आहे. आजच्या दिवशी 1954 मध्ये प्रयाग येथील कुंभमेळ्यात  झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 500 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.



1916- बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना (Banaras Hindu University) 


बनारसमधील बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) या विद्यापीठाची स्थापना 3 फेब्रुवारी 1916 रोजी झाली. स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांनी वसंत पंचमीच्या दिवशी या विद्यापीठाची स्थापना केली. डॉ. अॅनी बेझंट या विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. या  विद्यापीठाला राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे.



1925 : मुंबई बोरीबंदर ते कुर्ला दरम्यान विजेवर धावणारी पहिली लोकल सुरू (1st Electric Train) 


 3 फेब्रुवारी 1925 ला पहिली विजेवर धावणारी लोकल तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत हार्बर मार्गावर चालवण्यात आली होती. 3 फेब्रुवारी 1925 रोजी केवळ चार डबे घेऊन ही लोकल धावली होती. तिचा वेग काशी 50 मैल इतका होता. डबे हे लाकडी बनावटीचे होते. त्यात मध्ये लोखंडाचा देखील वापर करण्यात आला होता. मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती. तेव्हाच्या वृत्तपत्रात भारतात एका प्रदूषणरहित नवीन युगाची सुरुवात, अशा मथळ्याखाली बातम्या छापून आल्या होत्या.


फेब्रुवारी 1925 नंतर अनेक नवनवे तंत्रज्ञान घेऊन लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावू लागल्या. इतकेच नाही तर विजेवर चालणारे इंजिन देखील बनवले गेले आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या विजेवर धावू लागल्या. त्यामुळे कोळसा आणि डिझेल जाळून होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत झाली.


1938: वहिदा रहमान यांचा जन्म (Waheeda Rehman) 


प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री वहिदा रहमान यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 रोजी झाला. वहिदा रेहमान या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यांनी तेलुगू, तमिळ आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 1950, 1960 आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना विविध शैलीतील चित्रपटांमधील योगदानासाठी ओळखले जाते. वहिदा रेहमान यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.


1954-  प्रयाग कुंभ चेंगराचेंगरीमुळे 500 लोकांचा मृत्यू (Allahabad Kumbh Mela) 


आजच्या दिवशी इतिहासात, 14 फेब्रुवारी 1954 रोजी अलाहाबादमध्ये प्रयाग कुंभ दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 500 लोकांचा मृत्यू झाला होता. कोट्यवधी लोकांना संगमाकडे खेचणाऱ्या या श्रद्धेच्या पवित्र सणावर घडलेल्या या अप्रिय घटनेने देशभर दु:ख व्यक्त करण्यात आलं. या घटनेनंतर कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या व्यवस्थेत आणि जत्रेच्या स्वरूपामध्ये व्यापक बदल करण्यात आले.


1963: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा जन्म (Raghuram Rajan) 


रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963 रोजी झाला. रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23 वे गव्हर्नर होते. 4 सप्टेंबर 2013 रोजी डी. सुब्बाराव यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी हे पद स्वीकारले. त्याआधी ते तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. रघुराम राजन यांनी एरिक जे. बूथ स्कूल ऑफ बिझनेस शिकागो विद्यापीठात प्रोफेसरचं काम केलं. त्यांनी भारतीय अर्थ मंत्रालय, जागतिक बँक, फेडरल रिझर्व्ह बोर्ड आणि स्वीडिश संसदीय आयोगाचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे. 2011 मध्ये ते अमेरिकन फायनान्स असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि सध्या ते अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्य आहेत.


1969: सी एन अन्नादुराई यांचे निधन (C. N. Annadurai)


कांजीवरम नटराजन अन्नादुराई हे तमिळनाडूतील लोकप्रिय राजकारणी होते. तामिळनाडूचे ते पहिले बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे संस्थापक होते. त्यांना अण्णा म्हणजे तमिळमध्ये मोठा भाऊ म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1969 रोजी अतिशय साध्या कुटुंबात झाला. आधुनिक तमिळनाडूचे जनक असंही त्यांची ओळख आहे. 



2018- भारताने चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला (Team India) 


3 फेब्रुवारी हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी एक संस्मरणीय दिवस होता. या दिवशी भारताने चौथ्यांदा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकला. 3 फेब्रुवारी 2018 रोजी न्यूझीलंडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाचा आठ गडी राखून पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाला 216 धावांत गुंडाळून फलंदाजांचे काम सोपे केले आणि त्यानंतर मनजोत कालरा याने 102 धावांची शानदार खेळी खेळून आपल्या संघाला विक्रमी चौथ्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले.


>> इतर महत्त्वाच्या घटना


1760: सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उदगीरच्या लढाईत निजामाच्या सैन्याचा पराभव केला.


1971: चंद्रावरील तिसऱ्या यशस्वी मानव मोहिमेदरम्यान अमेरिकेचे अंतराळयान अपोलो 14 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.


1988: INS चक्र पाणबुडीचा नौदलात समावेश (INS Chakra). INS चक्र ही पहिली आण्विक शक्ती असलेली पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात आली.


2006- इजिप्तमध्ये बोट बुडाली, हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू