लहान मुलांनी खेळताना रुपयांची नाणी ,टाच पिन,वेगवेगळ्या बिया झाल्याचं आपण पाहिलं असेल ऐकलं असेल पण औरंगाबादेत एका 33 वर्षीय व्यक्तीने टूथब्रशच गिळल्याची घटना घडली आहे. टूथब्रश पोटात गेल्याने त्या व्यक्तीला वेदना सुरू झाल्या. सदर व्यक्तीला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.


तपासणीसाठी डॉक्टरांनी सिटीस्कॅन केलं तर चक्क व्यक्तीच्या पोटात लांबलचक टूथब्रश पाहायला मिळाला. पोटात चक्क टूथब्रश पाहूनडॉक्टरही चक्रावून गेले. तब्बल तास-दीड तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा टूथब्रश काढला.


ही घटना 26 डिसेंबरची आहे औरंगाबाद शहरातील एका व्यक्तीने सकाळी दात घासताना त्याने टूथब्रशच गिळला. पोट दुखू लागल्याने सदर व्यक्ती सकाळी 11वाजता घाटी रुग्णालयात दाखल झाला. रुग्णाची अवस्था पाहून तत्काळ उपचार सुरु झाले. उपचारासाठी रुग्णाचा सीटी स्कॅन काढण्यात आला. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. हा ब्रश कसा गिळला असेल, असा प्रश्न त्यांनाही पडला.


पोटदुखीच्या असाह्य वेदना सुरू असलेल्या या रुग्णाला वेदनेतून मुक्ती देण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हा ब्रश पोटातून काढला. सदर रुग्णांवर कक्ष क्रमांक 18 मध्ये उपचार सुरू असून, आता त्याची प्रकृती उत्तम आहे. मात्र ही घटना आश्चर्यकारक यासाठी आहे लहान बाळाने नव्हे तर चक्क 33 वर्षाच्या व्यक्तीनं हा ब्रश गिळला होता.


डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा ब्रश बाहेर काढला असून सदरील व्यक्तीची प्रकृती सध्या ठणठणीत आहे. या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा पथक क्रमांक-6 चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ.सुकन्या विंचूरकर, डॉ.गौरवभावसार, भुलतज्ज्ञ डॉ. अनिकेत राखूडे,डॉ. विशाखा वाळके, अधिपरिचारिका संतोशी सोनगट्टी यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.