31st August In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजचा दिवसही इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत. माँटेसॉरी नावाने भारतात असलेली शिक्षण पद्धत ज्यांच्या नावावरून आल्या त्या शिक्षण तज्ज्ञ मारिया माँटेसॉरी यांचा जन्म आजच्या दिवशी झाला.  प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्मदिनही आज आहे. भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन आजच्या दिवशी झाले. 



1870 : इटालियन शिक्षण तज्ज्ञ मारिया माँटेसॉरी यांचा जन्म


मारिया टेक्ला आर्टेमिसिया माँटेसॉरी या इटालियन डॉक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी पुरस्कृत केलेली लहान मुलांसाठीची शिक्षणपद्धती जगभरात वापरली जाते. 


1896  ते 1901 पर्यंत, मॉन्टेसरी यांनी तथाकथित "फ्रेनेस्थेनिक" मुलांसोबत काम केले आणि संशोधन केले - संज्ञानात्मक विलंब, आजारपण किंवा अपंगत्व अनुभवणारी मुले यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणे, अभ्यास करणे, बोलणे आणि लेखन प्रकाशित करणे या गोष्टी सुरू केल्या. माँटेसॉरी थियोसोफिकल सोसायटीच्या सदस्या होत्या. 1939 मध्ये त्या चेन्नईच्या थियोसोफिकल सोसायटीमध्ये आपल्या शिक्षणपद्धतीचा वर्ग घेण्यासाठी आल्या होत्या. 


मॉन्टेसरी यांनी निरीक्षणांवर आधारित, बालवाडीतील मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक पद्धती लागू केल्या. त्या त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि पद्धतीचे वैशिष्ट्य बनल्या. त्यांनी जड फर्निचरच्या जागी,मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे यांचा वापर सुरू केला. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आणि स्वयंपाक करणे, झाडू मारणे, धान्य निवडणे, भाजीपाला निवडणे यासारख्या कृतींचा समावेश शिक्षणामध्ये केला. त्यांच्या भारतातील वास्तव्यात त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयोगांवर आधारित व्याख्याने दिली, प्रशिक्षण वर्ग चालविले. त्यांच्या हाताखाली अकराशे शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आणि माँटेसरी शाळा सुरू केल्या. 



1919 :  प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म 


पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम यांचा आज जन्मदिन.  अमृता प्रीतम या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात. स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाब राज्यातील गुजरानवाला येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. शिक्षणदेखील तेथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.


वयाच्या 16 व्या वर्षी  'अमृत लेहरन' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. 


स्वातंत्र्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते गुरू राधा किशन यांनी दिल्लीत पहिले जनता ग्रंथालय आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. स्वातंत्र्यानंतर काही काळ सामाजिक कामातही अमृता प्रीतम सहभागी होत्या. या ग्रंथालयाचे उद्घाटन बलराज साहनी आणि अरुणा असफ अली यांच्या हस्ते झाले होते. 


अमृता प्रीतम यांना 1957 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 1958 मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, 1988 मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि 1982 मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


रसीदी टिकट हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित आहे.  त्याशिवाय, अदालत, उन्चास दिन, कोरे कागज, तेरहवाँ सूरज, दिल्ली की गलियाँ, रंग का पत्ता आदी कांदबऱ्या आहेत. त्याशिवाय, कस्तुरी, कागज ते कॅनवस, सुनहुडे, आदी काव्य संग्रह प्रकाशित आहेत. त्याशिवाय, त्यांनी ललित गद्य, कथा संग्रहांचे लेखन केले आहे. 


 


1940 : मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म
 


मराठी कादंबरीकार, मृत्यूंजयकार आणि मराठी साहित्य विश्वात इतिहास घडवणारे दिवंगत साहित्यिक शिवाजी गोविंदराव सावंत यांचा आज जन्मदिन.  त्यांनी लिहीलेली ‘मृत्यूंजय’ या कादंबरीला मराठी साहित्यात विशेष स्थान आहे. महाभारतातील योध्दा कर्णच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी आहे. 1967 साली लिहिली गेलेली ‘मृत्यूंजय’ कादंबरी आजही लाखो तरुणांच्या हृद्यात कायमची वसली आहे. त्यांच्या छावा, युगंधर या कांदबऱ्याही विशेष गाजल्या. त्यांच्या छावा आणि मृत्यूंजय कादंबरीवर मराठी नाटकंही रंगभूमीवर आपल्याला पहायला मिळतात. कोल्हापुरातील आजरा गावात 31 ऑगस्ट 1940 साली शिवाजी सावंत यांचा जन्म झाला.  


1963 : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म


ऋतुपर्णो घोष  यांचा जन्म 31 ऑगस्ट 1963 रोजी झाला. ते बंगाली चित्रपट दिग्दर्शक होते. अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी जाहिरात एजन्सीमध्ये सर्जनशील कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1994 मध्ये त्यांचा 'हीर अंगती' हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी पडद्यावर आलेल्या युनिशे एप्रिल या त्यांच्या पुढच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुमारे दोन दशकांच्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांना एकूण 12 राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 30 मे 2013 रोजी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 


1969 : भारताचा जलदगतीचा गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म


जवागल श्रीनाथ हा भारताच्या उत्कृष्ट  जलदगती गोलंदाजांपैकी एक होता. फिरकीपटू गोलंदाजांचा बोलबाला असणाऱ्या भारतीय संघात जलदगती गोलंदाज म्हणून जागा मिळवली आणि टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली. 


भारतासाठी खेळताना श्रीनाथने 67 कसोटी सामन्यात 236 विकेट्स घेतल्या. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात श्रीनाथच्या गोलंदाजीला अधिकच धार आली. करिअरच्या शेवटच्या 33 कसोटी सामन्यात 30 पेक्षा कमी सरासरीने धावा मोजत 118 बळी घेतले. एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स म्हणजे 132 धावा देऊन 13 विकेट्स घेतल्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. 2002 मध्ये त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना खेळला.  2003 च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने निवृत्ती घेतलेल्या श्रीनाथला आपला निर्णय मागे घेण्यासाठी मन वळवले. दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकात श्रीनाथने प्रभावी कामगिरी केली. या स्पर्धेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा रामराम केला. सध्या श्रीनाथ हा आयसीसीचा सामनाधिकारी म्हणून काम करतो. 


1973 : शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन 


प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक यांचा जन्मदिन. वडील सदाशिवराव हे सुबोध पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादनाबरोबरच हितोपदेश, कामगार ही साप्ताहिक आणि ज्ञानदीप हे मासिक चालवत असत. आई उमाबाई या  स्त्री शिक्षण, विधवा विवाहासाठी काम करत असे. बुद्धिमान व सुधारणावादी आईवडीलांमुळे ताराबाईंकडे बुद्धिमत्तेचा वारसा आला. 1914 मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून बी. ए. झाल्या.


शिक्षणाचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता असते, या दृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नवीन पाऊल टाकले.1923-1932 ही नऊ वर्षे त्यांनी भावनगरच्याच दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केले. 1933पासून त्यांनी शिक्षणाबाबची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. 1936 साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. पुढे बालशिक्षणाचे हे लोण महाराष्ट्रात पसरले. 1936-48 या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. या संस्थेने पुढे पूर्वप्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले. यातून मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांच्या हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले.



2020 : भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन 


भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा आज स्मृतीदिन आहे. प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणात पाच दशके कार्यरत होते. काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते, संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याआधी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला. प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. भारतीय राजकारण-समाजकारणातील योगदानासाठी त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. तर, 2019 मध्ये त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 


प्रणव मुखर्जी हे 1967 मध्ये बांग्ला काँग्रेसची स्थापना करणाऱ्या सदस्यांपैकी एक होते. काँग्रेसच्या विरोधात 1967 मध्ये संयुक्त मोर्चा स्थापन करण्यात भूमिका बजावली. 1969 मध्ये ते बांग्ला काँग्रेसच्या माध्यमातून राज्यसभेवर निवडून गेले. पुढे बांग्ला काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाले. त्यानंतर मुखर्जी हे 1975, 1981, 1993, 1999 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. 1973 मध्ये ते इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातही होते. मुखर्जी यांनी भारतीय योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून ही काम केले. त्याशिवाय, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आदी जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. 



इतर महत्त्वाच्या घडामोडी : 


1569 :  चौथा मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म 
1920: खिलाफत चळवळीची सुरुवात.
1947: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
1957: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
1962: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
1970: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
1971: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
1995 : खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचे निधन
1996: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.