30 April In History : आजचा दिवस भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन हा 30 एप्रिलचा. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेदेखील आजच्याच दिवशी जन्मले. भारतीय क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्माचा जन्मही आजचाच. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया सविस्तरपणे, 


1870 : भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म 


भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचा जन्म  30 एप्रिल 1870 रोजी झाला. भारतीय चित्रपट कलेला वैभव मिळवून देणाऱ्या दादासाहेब फाळकेंना भारतीय चित्रपटांचा जनक म्हटलं जातं. 1913 साली त्यांनी तयार केलेला पहिला मूक चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट आहे. 


ज्या काळात केवळ नाटक अन् लोककलेमधून भारतातील लोकांचे मनोरंजन केले जात होते, त्याच काळात दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र भारतात आणून भारतीयांना चित्रपटाची ओळख करुन दिली. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना 'भारतीय चित्रपसृष्टीचे जनक' असं म्हटलं जातं. आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत, 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी 95 चित्रपटांची आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. 16 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांचे निधन झाले. 


दादासाहेब फाळके यांच्या नावानं भारतीय चित्रपसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. 1969 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात झाली.  हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्यातर्फे दिला जातो. दादासाहेब फाळके यांच्यावर एका चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली आहे. 'हरिश्चंद्रची फॅक्टरी' असं त्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात दादासाहेब फाळके यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे


1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांना आधुनिक काळातील संत म्हणून ओळखले जाते. 30 एप्रिल 1909 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील जातीभेद आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे अत्यंत प्रभावी काम केले. ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी  1955 मध्ये त्यांना राष्ट्रसंत हा खिताब दिला.


1921 : जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म


जीपीएस (GPS) या नेव्हिगेशन सिस्टमचे सहसंशोधक रॉजर इस्टन यांचा जन्म 30 एप्रिल 1921 रोजी झाला. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम एक स्पेस-बेस्ड उपग्रह नेव्हिगेशन यंत्रणा आहे. या यंत्रणेमुळे जगाच्या पाठीवर कुठेलीही किंवा पृथ्वीच्या जवळील स्थानिक वेळ माहिती पुरविली जाते. यावर युनायटेड स्टेटस सरकारद्वारे देखरेख केली जाते. जीपीएस रिसीव्हरसह कोणालाही मुक्तपणे याचा ऍक्सेस आहे. ब्रॅडफोर्ड पार्किन्सन, रॉजर एल. ईस्टन आणि इव्हान ए. यांना जीपीएसचा शोध लावण्याचे श्रेय दिले जाते. 


1926 : मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म  


श्रीनिवास विनायक खळे हे मराठी संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधूर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादी भाषांमधील गीतांना खळे यांनी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत या गीतप्रकारामध्ये आहे. 'श्रीनिवास खळे' यांच्या घराण्याने सर्वसामान्य रसिकांला भावणाऱ्या भावगीतांना अमरत्व बहाल केलं. खळे यांनी आपल्या संगीतरचनांमधून आबालवृद्ध रसिकांचे आयुष्य समृद्ध केले. भावगीतांव्यतिरिक्त बोलकी बाहुली, जिव्हाळा, पोरकी, पळसाला पाने तीन यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळे यांनी संगीत दिले होते. तसेच लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी या दिग्गजांना घेऊन त्यांनी 'रामश्याम गुणगान' हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता.     


1913 : व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन 


केशन दामले यांना मराठीतील व्याकरणकार आणि निबंधकार म्हणून ओळखले जातात. प्रसिद्ध कवी केशवुत हे मोरे केशव दामले यांचे मोठे बंधू होते. मोरे दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हा सुमारे एक हजार पानांचा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांना आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात अनेक उदाहरणे आणि असंख शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. 30 एप्रिल 1913 रोजी त्यांचे निधन झाले.  


1936 : वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला 


आजच्याच दिवशी 30 एप्रिल 1936 रोजी वर्ध्यामध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी सेवाग्राम आश्रमाची (Sevagram Ashram) स्थापना केली होती. महात्मा गांधींनी यापूर्वी साबरमती येथे आश्रम स्थापन केला होता, त्यानंतर हा दुसरा आश्रम होता. सेवाग्राम आश्रम गांधीजींच्या सर्जनशील कार्यक्रमांचे आणि राजकीय चळवळींचे केंद्र असायचे. 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 या कालावधीत गांधीजींनी साबरमती येथून मिठाचा सत्याग्रह करत दांडीयात्रा काढली. या आंदोलनात त्यांना अटक होऊन तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगातून परतल्यावर त्यांनी महाराष्ट्रात नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर हा आश्रम स्थापन केला. जमुनालाल बजाज यांनी आश्रमासाठी जमीन उपलब्ध करून दिली होती. महात्मा गांधींनी मूलभूत शिक्षण आणि नैसर्गिक शिक्षणाशी संबंधित इतर अनेक महत्त्वाचे प्रयोग केले होते. हा आश्रम 1942 च्या भारत छोडो आंदोलनासाठी आणि विधायक कार्य-खादी, ग्रामोद्योग तसेच सामाजिक सुधारणा कार्य-अस्पृश्यता निर्मूलन आणि इंग्रजी गुलामगिरीतून मुक्तीसाठी एक प्रमुख अहिंसक केंद्र राहिला.


1945 : जर्मनीचा नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली 


जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणारा जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचे (Adolf Hitler) निधन 30 एप्रिल 1945 रोजी झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव समोर दिसू लागताच त्याने स्वतःला गोळ्या घालून आत्महत्या केली. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा झालेला दारून पराभव त्याच्या जीवाला लागला आणि त्याने जर्मनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. नाझी पक्षाच्या माध्यमातून 1933 साली हिटलरने जर्मनीचं चॅन्सेलरपद मिळवलं. जर्मनीच्या पतनाला ज्यू लोक कारणीभूत असल्याचं सांगत त्याने लाखो ज्यू लोकांची कत्तल केली. 


जर्मनीची निर्विवाद सत्ता मिळवल्यानंतर संपूर्ण युरोपवर सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने हिटलरने पावले उचलली. त्यामुळेच जगभरात अस्थिरता निर्माण झाली आणि जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं गेलं. हिटलरने आपल्या कारकिर्दीत अनेक निष्पाप लोकांना ठार मारलं. 'माईन काम्फ' हे हिटलरने आपल्या जीवनावर आधारीत आत्मचरित्र लिहिलं आहे. 


1987 : भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याचा जन्म 


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर मधील बनसोड या शहरात झाला. 2005 मध्ये देवधर करंडकमध्ये रोहितने पहिला सामना खेळला. रोहितला 'अर्जुन' आणि 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर 2019 मध्ये त्याला सर्वोत्म खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे.   


रोहित शर्माने 09 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्या सामन्यात रोहितने 177 धावांची खेळी केली. 13 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेच्या संघाविरुद्ध फलंदाजी करताना, त्याने 264 धावांची खेळी खेळून एका सामन्यात सर्वाधिक धावा म्हणजेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक द्विशतके झळकावणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके आणि ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतके झळकावणारा रोहित शर्मा क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज आहे.


2001 : गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन  


श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचा जन्म 21 ऑगस्ट 1924 रोजी झाला. श्रीपाद दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज पुरस्काराचे मानकरी होते. दाभोळकर हे  गणितज्ञ होते. ते कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. 30 एप्रिल 2001 रोजी त्यांचे निधन झाले.  


2003 : मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन 


वसंत गोविंद पोतदार हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार होते. पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी 1962 साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर 'सेर शिवराज' (शिवाजी), एका पुरुषोत्तमाचा गाथा (पु.ल. देशपांडे), 'योद्धा संन्यासी' (विवेकानंद), महात्मा फुलेंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारले दहा हिंदी-बंगाली-मराठी एकपात्री नाट्यप्रयोग करत ते 40 वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले. 30 एप्रिल 2003 रोजी त्यांचे निधन झाले. वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले. 


2014: भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन 


खालिद चौधरी यांचा जन्म 20 डिसेंबर 1919 रोजी झाला. बंगाली कलाकार आणि थिएटर कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी संभू मित्रा, त्रिपाठी मित्रा आणि श्यामानंद जालान यांच्यासह विविध हिंदी आणि बंगाली नाटकांचे दिग्दर्शन केले. 2012 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 30 एप्रिल 2014 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.