28th June In History: इतिहासातील प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व आहे. इतिहासातील काही घटनांची भविष्यातही नोंद घेतली जाते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवरही या घटनांचा परिणाम होत असतो. आजच्या दिवशी इतिहासात काही घटना अशाच घडल्या आहेत. ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया (Queen Victoria) यांचा राज्याभिषेक आजच्या दिवशी झाला. त्या भारताच्या सम्राज्ञी होत्या. त्यांच्या सत्ताकाळात मोठे बदल झाले. तर, भारताला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढणारे देशाचे 9 वे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा आज जन्म दिन आहे. दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक असलेले डॉ. गंगाधर पानतावणे यांचा जन्मदिवसही आज आहे. 



1838: राणी व्हिक्टोरिया (Queen Victoria) यांचा राज्याभिषेक


1838 मध्ये ब्रिटिश साम्राज्याशी सम्राज्ञी म्हणून व्हिक्टोरिया (Queen Victoria) यांचा राज्याभिषेक करण्यात आला. राणी व्हिक्टोरिया या ब्रिटीश भारताच्या पहिल्या सम्राज्ञी आहेत.  1837 साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी म्हणून गादीवर आली. व्हिक्टोरिया राणीने 63 वर्ष 7 महिने सत्ता सांभाळली. तिचा कार्यकाळ व्हिक्टोरियन पर्व ह्या नावाने ओळखला जातो. हा काळ ब्रिटनमध्ये राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक व लष्करी प्रगतीचा काळ मानला जातो. भारतातील 1857 च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी नष्ट होऊन तिच्या नावाने भारताचा कारभार सुरू झाला. त्यावेळी तिने काढलेला जाहिरनामा राणीचा जाहिरनामा म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानची सम्राज्ञी असा पुढे तिने किताब ही धारण केला.



1921: भारताचे 9 वे पंतप्रधान नरसिंह राव यांचा जन्म


पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव अर्थात पी. व्ही. नरसिंह राव यांचा जन्म दिन.  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. 1962 साली केंद्रीय मंत्री झाले. ते 1971 पर्यंत केंद्रात मंत्री होते. 1971 ते 1973 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली.  राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी 1991 ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.


नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.


1991 साली भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, देशावर आर्थिक संकट आलं असताना त्यांनी नव्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या. त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्या साथीने त्यांनी 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था खुली केली आणि जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण राबवले. 


1937: साहित्यिक समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांचा जन्म 


लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे यांचा आज जन्मदिन. पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. 


1963 मध्ये पानतावणे नागपूरहून औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. आणि तिथल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. औरंगाबादमध्येच त्यांनी साहित्य चळवळ सुरू केली; तिला तरुणांचा आणि विचारवंतांचा मोठा पाठिंबा मिळाला. दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी 50 वर्ष काम पाहिले.  या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक मराठी साहित्यविश्वाला दिले आहेत.


साहित्य, समाज आणि संस्कृती या विषयांवरील त्यांनी एकूण 20 वैचारिक व संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत. याखेरीज 12 पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांची लेखणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज ह्यांच्या विचारधारेतून निर्माण झाली आहे. 


भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या साहित्य, समाज तथा संस्कृतिविषयक अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केलेले आहे. मराठी भाषेतील व साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. साहित्य विश्वात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना 'पद्मश्री' या नागरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 


इतर महत्त्वाच्या घटना: 


1712: फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार रुसो यांचा जन्म
1846: अ‍ॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.
1926: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
1970: पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मुश्ताकअहमद यांचा जन्म.
1972: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला
1998 : साली संयुक्त राष्ट्रांने सन 1948 साली मानवी संरक्षणासाठी घेतलेल्या मानवी हक्काविषयी सार्वत्रिक जाहीरनाम्यास पन्नास वर्ष पूर्ण झाली.