28th January In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. त्या-त्या दिवशी घडलेल्या घटनांचा परिणाम भविष्यकाळातील घटनांवरही होत असतो. 28 जानेवारी 1986 रोजी अमेरिकेचे अंतराळ यान कोसळले आणि त्यामध्ये सात अंतराळवीरांना आपला प्राण गमवावा लागला. तसेच देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांनाही आजच्याच दिवशी शिक्षा सुनावण्यात आली होती. 


1813- 'प्राईड अँड प्रिज्युडिस या रोमॅंटिक कादंबरीचे प्रकाशन 


ब्रिटनच्या प्रसिद्ध लेखिका जेन ऑस्टेन यांची रोमँटिक कादंबरी 'प्राईड अँड प्रिज्युडिस' हे पुस्तक पहिल्यांदा 28 जानेवारी 1813 रोजी प्रकाशित झाले. इंग्रजी साहित्यातील सर्वात लोकप्रिय कादंबरीमध्ये या कादंबरीची गणना केली जाते.


1835- कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना


कलकत्ता मेडिकल कॉलेज (Medical College Kolkata) म्हणजे सध्याचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कोलकाता या देशातील सर्वात जुन्या मेडिकल कॉलेजची स्थापना ब्रिटिश काळात 28 जानेवारी 1835 रोजी करण्यात आली. लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या प्रयत्नाने या मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली. 


1865- लाला लजपतराय यांचा जन्मदिन 


देशभक्त आणि स्वातंत्रसेनानी लाला  लजपत राय (Lala Lajpat Rai) यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी झाला. लाला लजपत राय हे भारताचे प्रमुख स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना पंजाब केसरी असंही म्हटलं जायचं. त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली. ते लाल-बाल-पाल या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालमतवादी गटातील तीन प्रमुख नेत्यांपैकी एक होते. 1928 मध्ये त्यांनी सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शनात भाग घेतला होता. त्या दरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये ते गंभीर जखमी झाले आणि शेवटी 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले. 


1898- भगिनी निवेदिता यांचे भारतात आगमन


स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता (Bhagini Nivedita) यांचे आजच्या दिवशी, म्हणजे 28 जानेवारी 1898 रोजी भारतात आगमन झालं. भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव 'मार्गारेट एलिझाबेथ नोबल' असं होतं. त्या एक अँग्लो-आयरिश समाजसेविका, लेखिका, शिक्षिका आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या. भगिनी निवेदिता यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या देशभक्तांना उघडपणे मदत केली. तसेच स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातही भरीव योगदान देणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये सिस्टर निवेदिता यांचे नाव प्राधान्यांनं घेतलं जातं. भगिनी निवेदिता यांची ओळख स्वामी विवेकानंद यांच्या माध्यमातून भारतात झाली. स्वामी विवेकानंदांचे मनमोहक व्यक्तिमत्व, अहंकारहीन स्वभाव आणि भाषणशैली यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. 


1899 : स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म



 के. एम. करिअप्पा यांनी पहिल्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश लष्करात प्रशिक्षण घेत लष्करात सहभागी झाले होते. तर 1942 मध्ये ते कर्नल झाले. दुसऱ्या महायुद्धात इराक, सिरिया आणि इराण (1941-42), तसेच ब्रह्मदेशातील आराकान (1943-44) येथील लष्करी मोहिमांत ते सहभागी होते. 1947 साली लंडनच्या इंपीरियल डिफेन्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. स्वंतत्र भारतात सेनाप्रमुख म्हणून 1949-53 या काळात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.


भारतीय लष्करातील सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले.  अनेक क्रीडासंस्था आणि निवृत्त सैनिकांच्या संस्था यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.


1986 मध्ये 86 वर्षांचे असतांना त्यांना फील्ड मार्शल हा लष्करातील सर्वोत्तम बहुमान बहाल करण्यात आला. 1947  मध्ये भारत पाकिस्तान युद्धात त्यांच्याकडे पश्चिम विभागाची जबाबदारी होती. त्यांनी भारतीय लष्कर उभारणीत मोलाची भूमिका बजावली आहे. 1993 मध्ये 94 वर्षी त्यांचे निधन झाले.


1928- अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांचा जन्मदिन


भारतीय अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा (Raja Ramanna) यांचा जन्म आजच्या दिवशी, 28 जानेवारी 1928 रोजी झाला. ते भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे शिल्पकार होते. राजा रामण्णा यांना 1973 मध्ये भारत सरकारने विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 


1933- मुस्लिमांच्या वेगळ्या देशासाठी पाकिस्तान या नावाची सूचना 


स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच धर्माच्या आधारावर वेगळ्या पाकिस्तानची (Pakistan) मागणी केली जात होती. कट्टर धर्मवेडा असलेल्या रहमत अली चौधरी याने 28 जानेवारी 1933 रोजी 'नाऊ ऑर नेव्हर' हा लेख लिहिला आणि त्यामध्ये मुस्लिमांच्या वेगळ्या देशासाठी पाकिस्तान हे नाव सुचवलं. 


1986- अमेरिकेचं अंतराळ यान कोसळलं, सातजणांचा मृत्यू 


इतिहासातील आजचा दिवस अमेरिकन अंतराळाविश्वासाठी अत्यंत धक्का देणारा ठरला. 28 जानेवारी 1986 रोजी अमेरिकेचे स्पेस शटल चॅलेंजर अवकाशात क्रॅश झाले. फ्लोरिडा येथून टेकऑफ केल्यानंतर केवळ 73 सेकंदात त्याचा स्फोट झाला आणि त्यात सर्व सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षकाचा समावेश होता. या शिक्षकाची अंतराळातील पहिला प्रवासी म्हणून म्हणून निवड झाली होती. 


1998- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा


आजच्याच दिवशी, 28 जानेवारी रोजी देशाची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 तामिळनाडूतील श्रीपेरांबुदूर येथे आत्मघाती स्फोटात हत्या (Rajiv Gandhi Assassination Case) करण्यात आली होती. या हत्येसाठी 1998 मध्ये टाडा कोर्टाने तब्बल 25 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. टाडा कोर्ट, मद्रास उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचल्यावर न्यायमूर्ती केटी थॉमस यांच्या खंडपीठाने 25 पैकी 19 दोषींची सुटका केली होती. मात्र पेरारीवलन, नलिनी श्रीहर, संतान आणि श्रीहरन चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. अन्य तिघांची फाशी जन्मठेपेत बदलण्यात आली. 


2007- प्रसिद्ध संगीतकार ओपी नय्यर यांचं निधन 


ओंकार प्रसाद नय्यर म्हणजेच संगीतकार ओ.पी. नय्यर (Omkar Prasad Nayyar) यांचं निधन 28 जानेवारी 2007 रोजी झालं. लाहोरमध्ये जन्मलेले आणि बबल संगीतासाठी ओळखले जाणारे हिंदी चित्रपटांचे ते प्रसिद्ध संगीतकार होते. ओ.पी. नय्यर यांनी 1949 मध्ये कनीज चित्रपटातून पार्श्वसंगीताद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आकाश (1952) साठी संगीत दिले. गुरु दत्त यांचा आरपार (1954) हा त्यांचा पहिला हिट चित्रपट होता. यानंतर गुरू दत्तसोबतच्या त्याच्या जोडीने मिस्टर आणि मिसेस 55 आणि CID सारखे चित्रपट दिले. नय्यर यांनी 'मेरे सनम'मध्ये आपल्या संगीताला एका नव्या उंचीवर नेले. गीता दत्त, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्यासोबत काम करून त्यांनी यांची कारकीर्द नवीन उंचीवर नेली. ओ.पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली गीते आजही लोकप्रिय आहेत. 


>> इतर महत्त्वाच्या बातम्या : 


1851: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. 
1930: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.
1937 : चित्रपट आणि भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.
1961: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.