सोलापूर : परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, कोकणाला जोरदार झोडपलं. हाताशी आलेलं पीक पाण्याखाली गेलं. पावसामुळे आर्थिक नुकसान झालंच पण सोबतच मोठी जीवितहानी देखील झाली. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यात एकूण 28 जणांचा मृत्यू झाला आहे असून एक जण बेपत्ता आहे.


आतापर्यंत जवळपास 29 हजार 292 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. यात पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 17 हजार नागरिकांचा समावेश आहे. तर 57 हजार 354 हेक्टर क्षेत्रातील पीक जमीनदोस्त झालं आहे. याशिवाय 2319 घरांची पडझड किंवा मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात 513 जनावरं नदीला आलेल्या पुरात वाहून गेली आहेत.





सोलापुरात 14 मृत्युमुखी
पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये सोलापुरातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बुधवारी पंढरपुरातील चंद्रभागा नदीकिनारी कुंभार घाटाची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांचा समावेश आहे. तर करमाळा तालुक्‍यात बुधवारी ओढ्याला आलेल्या पुरात जेऊर-लव्हे रस्त्यावरील पुलावरून एक कार वाहून गेली होती. ती वाहून गेलेली कार सापडली असून या कारमधील चारही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडील, मुलगा आणि अन्य दोघे असल्याचं समजतं.

सांगलीत पावसाचे 9 बळी
सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसात पूर्व भागातील नद्याच्या पुलावरुन आतापर्यंत 9 जण वाहून गेले आहेत. यातील सहा जणांचे मृतदेह सापडले तर तीन जणांचा शोध सुरु आहे. तर महापालिका क्षेत्रातील 300 हून अधिक लोकांचं काल स्थलांतर करण्यात आलं.


याशिवाय पुण्यात पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. तर साताऱ्यात एकाच बळी गेला आहे.


Maharashtra Flood | परतीच्या पावसाचं 'मृत्यूतांडव'