26th July Headline:  आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक आहेत. विरोधकांकडून सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. तर, राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावणार आहेत. देशात गाजलेल्या कोळसा खाण घोटाळा प्रकरणातील दोषींना आज सीबीआय विशेष कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. तर, मणिपूरमधील घटनेविरोधात विविध आदिवासी संघटनांनी नंदुरबार जिल्हा बंदची हाक दिली आहे. 
 


 संसदेचे पावसाळी अधिवेशन 


संसदेत आज सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बैठकीत मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरोधात अविश्वास आणण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने लोकसभा खासदारांना व्हीप जारी केला. खासदारांना आज सकाळी 10 वाजता संसदेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.



विधिमंडळ अधिवेशन 


मंगळवारी विधानसभेत पुरवण्या मागण्यांना मंजुरी देण्यात आली. विरोधी बाकावरील आमदारांना पुरेसा निधी न दिल्याची तक्रार करत आपला संताप व्यक्त केला. तर,  मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिकेत कार्यालय देण्यात आले. त्यावरून ठाकरे गट आक्रमक आहे. त्याचे पडसाद आजही विधिमंडळ अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. 
 


कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआय कोर्ट शिक्षा सुनावणार 


कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या सीबीआय विशेष न्यायालयाने आज शिक्षेची सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान निकाल राखून ठेवला होता. राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सात जण या प्रकरणात दोषी ठरवले आहेत. हा खटला संपायला 9 वर्षे लागली या काळात आम्ही खूप पीडा सहन केली, शिक्षा कमी करावी असा दोषींच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला आहे. 
 


आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा 


- मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 27 जुलैपर्यंत धुवांधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. ज्याचे रुपांतर डिप्रेशनमध्ये होणार आहे. ही सिस्टिम उत्तर आंध्र प्रदेश ते दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीजवळून उत्तर-पश्चिम दिशेला सरकेल. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात रायगड, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात देखील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून पुणे आणि साताऱ्यासाठी रेड अलर्ट जारी केला गेला आहे. सोबतच संपूर्ण मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा इशारा असून नांदेडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. सोबतच पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग


पुणे – खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पाऊस कायम राहिल्यास त्यात वाढच करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावर दुकाने आणि इतर गोष्टी असणार्‍यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 


नंदुरबार जिल्हा बंदची हाक


नंदुरबार – मणिपूरमधील आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी आज जिल्हा बंदची हाक दिली आहे. या जिल्ह्यातील जवळपास 17 पेक्षा अधिक आदिवासी संघटना सहभागी झाले आहेत. 
 


ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी छगन भुजबळांच्या याचिकेवर सुनावणी


महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी छगन भुजबळांसह इतर सर्व आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या याचिकांवर ईडी आज आपली भूमिका कोर्टात मांडणार.


सांगलीत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत आज कारगिल विजय दिवस 


सांगली -  सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत आज कारगिल विजय दिवस निमित्त कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव मध्ये सात हजार विदयार्थ्यांचे महावृक्ष संमेलन होणार आहे. यामध्ये प्रत्येक विदयार्थ्याला आंब्याचे झाड भेट देण्यात येणार आहे.