26 December Headlines: आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ आज ठाकरे गटाचं विधीमंडळात शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्याशिवाय जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात आजही विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज धरणे आंदोलन होणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे. 


आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ आज ठाकरे गटाचं विधीमंडळात शक्तीप्रदर्शन


आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ आज ठाकरे गटाचं विधीमंडळात शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई नागपूरात दाखल झाले आहेत. गेल्या आठवड्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंसह सगळे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. संजय राऊत म्हणाले की, नागपूर येथे उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही.  धमक्या द्या , तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करून घ्या. नंतर तुम्ही नसणार. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार, असंही ते म्हणाले. आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले.तुम्ही काय केले टेंडर काढली, भूखंड खाल्ले, असा आरोप त्यांनी केला. 


जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक -
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभेतून या अधिवेशन काळापुरतं निलंबित केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात न बसण्याचा निर्णय घेतला होता. आजही जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात आजही विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत.  सकाळी १० वाजता महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यानंतर सभागृहात बसायचं की नाही यासंदर्भात विरोधी पक्ष निर्णय घेणार आहेत. 


अधिवेशनातील महत्वाचे प्रस्ताव, चर्चा आणि प्रश्न प्रश्न- 
- विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंसह सेना नेते कर्नाटकच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार. ठाकरे गटाचा सरकारला चर्चेचा प्रस्ताव, दुपारी 12 वाजता.
- विधानपरिषदेत पनवेलमधील सिडको नैना प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री निवेदन करण्याची शक्यता
- विधानपरिषदेत राज्यातील गायरान जमिनीच्या प्रश्नावर सभागृहात महत्वाची चर्चा होऊ शकते. 
- विधानसभेत लोकायुक्त कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे.


अमोल मिटकरी स्वच्छतागृहाबाबत नवे पुरावे देणार- 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गेल्या आठवड्यात नागपुरातील आमदार निवासातील कॅन्टीनमधील भांडी स्वच्छतागृहात धुवून त्याच भांड्यांमध्ये लोकांना चहापान दिले जात असल्या संदर्भात व्हिडिओ ट्विट केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्याची चौकशी केली. ते व्हिडिओ त्या ठिकाणचे नसल्याचे उघड झाले. आता अमोल मिटकरी यांनीही ते व्हिडिओ आमदार निवासातील नाही, तर विधानभवन परिसरातील असल्याचा नवा दावा पुढे केला आहे. आज ते त्यासंदर्भात नवीन पुरावे समोर आणणार आहेत. त्यानंतर आमदार मिटकरी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील कलगीतुरा कोणत्या दिशेने जाईल हे स्पष्ट होईल. 


कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज धरणे आंदोलन


मराठीद्वेषी कर्नाटक सरकार आणि कानडी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बेळगावमधील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बेळगावहून दुचाकीवरून कोल्हापूरला येणार आणि कोल्हापूरात ठिय्या देणार.  कर्नाटक पोलिस अडवू शकतात हे लक्षात घेऊन एकत्र बेळगावहून निघणार नाहित तर टप्प्याटप्प्याने कोल्हापूरात येणार.   


मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी


पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी साडेबारा वाजता दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ‘वीर बाल दिवसानिमित्त’ होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांचे ‘शबद कीर्तन’ होणार असून, पंतप्रधान त्यातही सहभागी होतील. तसेच, यावेळी नवी दिल्लीत निघणाऱ्या मुलांच्या मार्च पास्ट म्हणजेच फेरीलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. साहिबजादे यांच्या असामान्य धैर्य आणि साहसाची कथा, देशातल्या सर्व नागरिकांपर्यन्त विशेषतः तरुण मुलांपर्यन्त पोहोचवून या इतिहासाविषयी त्यांना सचेत करण्यासाठी सरकार अनेक संवादात्मक आणि सहभागात्मक कार्यक्रमांचे  संपूर्ण देशभर आयोजन करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, निबंध लेखन, प्रश्न मंजूषा आणि इतर उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच, रेल्वे स्थानके , पेट्रोल पंप, विमानतळे अशा सार्वजनिक ठिकाणी याविषयी माहिती देणारी डिजिटल प्रदर्शने लावली जातील. त्याशिवाय, संपूर्ण देशभरात, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील, जिथे, अनेक मान्यवर साहिबजादे यांचे आयुष्य आणि त्यांच्या बलिदानाची कथा लोकांना सांगतील.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहे. राज्यात सुरु असलेल्या कामाची माहिती शिवराज सिंह चौहान पंतप्रधान मोदींना देणार आहेत. 


 श्रद्धा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आफताब याची व्हाइस स्टेट आज सीबीआयच्या कार्यालयात घेतली जाणार आहे. 


दिल्ली- राहुल गांधी आज शक्ती स्थळ, राजघाट, अटलबिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळांवर जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. 


पुणे- मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप आणि गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी किरीट सोय्या पुण्यात जाणार आहेत. 


पुरंदर- खासदार सुप्रिया सुळे या पुरंदर तालक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.  सुप्रिया सुळे या पुरंदर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.


नाशिक- नाताळच्या सुट्टीनिमित्त नाशिकच्या गंगापूर धरणावरील बोट क्लबसह इतर ठिकाणी पर्यटक दाखल होत आहेत. 


सोलापूर- शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेअंतर्गत मोहळ आणि कुर्डुवाडी येथे जाहीर सभा होणार आहेत.


वीज मोफत मिळावी यासाठी आंदोलन -
चंद्रपूर- वीज उत्पादक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट वीज मोफत मिळावी या मागणी साठी आज विधानभवनावर 'अधिकार मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी हा बाईक मोर्चा आयोजित केलाय.  यासाठी सकाळी ७.३० वाजता जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकातून बाईकस्वार कार्यकर्ते रवाना होतील.


सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्या अंतर्गत भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम या खात्याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यालयाचे ओरोस येथे सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.