या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर महिन्याला 75 कोटींचा भार येणार आहे.
सरकारकडून 5 रुपये प्रतिलिटर दूध संघाला देणार आहे आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकऱ्यांना मिळतील. प्रत्येक दूध संघाला या पाच रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असेल.
तसेच, विक्री व्यतिरिक्त जे दूध शिल्लक राहील आणि त्याची दूध भुकटी तयार केली जाईल, तेवढ्याच दुधाला सरकार दूध संघाना अनुदान दिले जाणार आहे.
या संदर्भातील निवेदन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काही वेळापूर्वी विधानपरिषदेत सादर केलं.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दूध दरवाढीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासह काही दूध संघाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, एबीपी माझानं दुपारी असा पर्याय समोर येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. सरकारच्या या निर्णयानंतर आता राजू शेट्टी यांना हा पर्याय मान्य होतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अर्जुन खोतकर विधानपरिषदेत काय म्हणाले?
"पिशवी बंद दुधासाठी कोणतेही अनुदान नाही. पिशवीबंद दूध वगळून दुधाला प्रति लिटर 5 रूपये अनुदान देणार आहोत. मात्र अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एकालाच मिळेल.", अशी माहिती खोतकरांनी दिली.
जे दूध भुकटी उत्पादक 5 रुपये प्रति लिटर लाभ घेतील, त्यांना दूध भुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही, असेही खोतकर म्हणाले. तसेच, 21 जुलैपासून सहकारी आणि खासगी दूध संस्थांना 25 रुपये प्रति लिटर दर दिल्यास लाभ मिळेल, असेही ते म्हणाले.
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
"राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्याबाबत खासगी आणि सहकारी दूध संघ यांची बैठक पार पडली. राज्यातील दुधाचे घसरलेले भाव पाहता शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. गायीच्या दुधाला खासगी असो सहकारी 25 रुपये प्रति लिटर भाव देण्याचा निर्णय झाला." असे सदाभाऊ यांनी सांगितले.
खासदार राजू शेट्टींचं आदोलन
दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी मुख्य शहरातील दूध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरुच ठेवलं आहे. राज्यभरात या दूध आंदोलनाचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहेत. दूध उत्पादकांना लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दूध संकलन बंदीचे आंदोलन सुरु केले आहे.
'स्वाभिमानी'च्या नेमक्या मागण्या काय? -
- दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.
- पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असून दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईचं दूध सरकारने 27 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - राजू शेट्टी
दूध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबा