औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनेच कचरा कोंडीवरुन आंदोलन केलं आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 3 ट्रक कचरा ओतला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला.

महापालिका काम करतेय मात्र जिल्हा प्रशासन कचरा कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यात काही लोक राजकारण करुन शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळेच प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केल्याचं शिवसेनेने सांगितलं.

तर माझ्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकण्याचा घृणास्पद आणि लांछनास्पद प्रकार केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणं हे निंदनीय असून आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत.