24th August In History: आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शाळेतील पाठ्यपुस्तकांत ज्यांच्या कविता शिकत आणि ऐकत आपण मोठे झालो, ज्यांच्या कवितांमधून जगण्याचे तत्वज्ञान बोली भाषेतून समजले अशा प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिन आहे. स्वातंत्र्यसैनिक शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म देखील आजच्या दिवशी झाला. तर कोलकाता शहराची स्थापना देखील आजच्याच दिवशी झाली. आजच्या दिवशी घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घटना आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया.
1908: शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म
शिवराम राजगुरू हे एक महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फाशीवर गेलेल्या क्रांतिकारकांपैकी राजगुरू हे एक होते. राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुण्यातील खेड येथे झाला.
क्रांतिकारक रागजुरू हे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांसारख्या अनेक घटनांमध्ये राजगुरूंचा सहभाग होता. ब्रिटीश पोलीस अधिकारी साँडर्सची हत्या केल्याचा ठपका ठेवत 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग आणि सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आली. हसत हसत तिघेही फाशीला सामोरे गेले. या तिघांच्या बलिदानाचा 23 मार्च हा दिवस भारतात 'शहीद दिन' म्हणून पाळण्यात येतो.
1880: कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म
प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगावपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या असोदे गावातील प्रतिष्ठित महाजनांच्या घरी झाला. वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाई चौधरींचा जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. बहिणाबाईंच्या कवितांतून आपल्याला निसर्ग अनेक रुपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताले चटके, तव्हा मिळते भाकर...
बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी महाराष्ट्रातील लोकांपैकी कुणी ऐकल्या किंवा वाचल्या नसतील असं होणार नाही. बहिणाबाईंचा संपूर्ण दिवस हा घरकाम आणि शेती कामात जायचा. घरातली आणि शेतीची कामं करताना बहिणाबाईंचं नातं संसार, निसर्ग, ऊन, वारा, पाऊस, पशु-पक्षी अशा अनेक गोष्टींशी जोडलं गेलं आणि कामं करता करता त्यांना कविता, ओव्या, गाणी सुचू लागली.
बहिणाबाईंना मुलगी काशी आणि ओंकार आणि सोपान अशी दोन मुलं होती. जळगावच्या प्लेगच्या साथीत मुलगा ओंकारला कायमच अपंगत्व आलं. बहिणाबाई 30 वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचंही निधन झालं. आता संसाराचा गाडा कसा चालवायचा? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यातही त्यांनी मुलांवर चांगले संस्कार करत संसाराचा गाडा ओढला.
बहिणाबाई स्वत: निरक्षर होत्या, पण त्यांच्याकडे काव्यरचनेची प्रभावी किल्ली होती. बहिणाबाईंचा मुलगा सोपान आणि मावसभावाने त्यांच्या कविता तिथल्या तिथे जमेल तशा टिपून ठेवल्या आणि अजूनपर्यंत जपल्या. तर अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालं आहे, त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असं नाव देण्यात आलं आहे.
अरे खोप्या मंदि खोपा सुगरणीचा चांगला,
देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला
बहिणाबाईंच्या रचना या खानदेशातील लेवा गण बोलीतील आहेत. बोलीभाषेतील या रचना असल्यामुळे त्यात गावरान गोडवा आणि आपलेपणा आपसूकच जाणवतो. प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण त्यांच्या कवितेत जाणवतं. वयाच्या 71व्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी बहिणाबाईंचा मृत्यू झाला.
2019: माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते अरुण जेटली यांचा स्मृतीदिन
28 डिसेंबर 1952 मध्ये जन्मलेले अरुण जेटली हे अतिशय हुशार भारतीय राजकारणी होते. आपल्या युक्तिवादपूर्ण वक्तृत्वाने भल्याभल्यांना गारद करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या राजकीय प्रवासास विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात झाली होती. जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवतानाच आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला होता. विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, कायदा मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द प्रचंड गाजली होती. श्वसनाच्या त्रासामुळे 24 ऑगस्ट 2019 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे केंद्रात दोनवेळा सत्ता आणणारा भाजपचा पडद्यामागचा कुशल रणनीतीकार काळाच्या पडद्याआड गेला.
1690: कोलकाता शहराची स्थापना
पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहराची स्थापना 1690 मध्ये आजच्याच दिवशी झाली. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासक जॉब चारनॉकने त्या काळात कोलकाता शहराची स्थापना केली. पूर्वी कलकत्ता नावाने हे शहर ओळखलं जात होतं, ज्याचा उल्लेख इंग्रज 'कैलकटा' असा करायचे. कोलकाता हे भारतातील दुसरं मोठं महानगर आणि पाचवं मोठं बंदर आहे, जे बंगालच्या उपसागराच्या मुख्य किनाऱ्यापासून 170 किमी अंतरावर वसलेलं आहे.
कोलकाता ही भारताची बौद्धिक राजधानी मानली जाते. ब्रिटिश राजवटीत कोलकाता ही भारताची राजधानीच होती. कोलकाता हे लंडननंतर ब्रिटिश साम्राज्याचं दुसरं मोठं शहर मानलं जायचं. बंगाली भाषेत या शहराला नेहमीच कोलकाता किंवा कोलिकाता असं म्हटलं जायचं, तर हिंदी भाषेत त्याला कलकत्ता असं म्हणतात.
इतर महत्त्वाच्या घटना:
1609: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचं प्रात्यक्षिक दाखवलं.
1872: भारतीय साहित्यसम्राट आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक नरसिंह चिंतामण केळकर यांचा जन्म (निधन: 14 ऑक्टोबर 1947)
1888: मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचा जन्म - पद्म विभूषण (निधन: 8 मार्च 1957)
1891: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचं पेटंट घेतलं.
1919: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा (एअरबस 320) लंडन ते पॅरिस सुरू झाली.
1925: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचं निधन (संस्कृत पंडित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक आणि समाजसुधारक)
1932: साहित्यसमीक्षक रावसाहेब गणपराव जाधव यांचा जन्म (मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक, ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे तिसरे अध्यक्ष आणि ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक)
1966: रशियाचे लुना-11 हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.
1993: भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचं निधन (जन्म: 14 जानेवारी 1892)
1995: मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
1997: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचं विभाजन, उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
1980: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
2004: मॉस्कोच्या दॉमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन निघालेली दोन विमानं आत्मघातकी हल्लेखोरांच्या बॉम्ब हल्ल्यात नष्ट, शेकडो ठार.