24 March In History : जगाच्या इतिहासात 24 मार्च या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटनांची नोंद असली तरी हा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तीन वर्षांपूर्वी, कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 500 च्या पुढे गेल्यानंतर हे खबरदारीचे पाऊल उचलण्यात आलं होतं. क्षयरोगाच्या संदर्भातही आजचा दिवस विशेष आहे. डॉ. रॉबर्ट कोच यांनी 24 मार्च 1882 रोजी मायकोबॅक्टेरियम म्हणजेच क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावल्याचं जाहीर केलं. यामुळेच 24 मार्च हा दिवस जगभरात जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. 24 मार्च 1946 राजी ब्रिटनचे कॅबिनेट मिशन भारतात आले होते.


देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 24 मार्च रोजी नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे, 


1307: देवगिरीचा किल्ला खिलजीने काबिज केला


यादवांची सत्ता असलेला देवगिरी किल्ला (Devgiri Daulatabad Fort) आजच्या दिवशीच म्हणजे 24 मार्च 1307 रोजी अल्लाउद्दीन खिलजीच्या (Alauddin Khalji) हातात गेला. अलाउद्दीन खिलजीच्या नेतृत्वाखाली मलिक काफूरने देवगिरीचा अजिंक्य किल्ला काबीज केला. त्यानंतर या किल्ल्याचं नाव दौलताबाद असं करण्यात आलं. नंतरच्या काळात मोहम्मद बिन तुघलकाने दिल्लीवरून आपली राजधानी हलवली आणि ती दौलताबादला आणली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांनी हा किल्ला मुघलांकडून मिळवला. 


1855: कोलकाता ते आग्रा या पहिल्या टेलिग्राफची सुरुवात


ब्रिटीशकालीन भारतात 24 मार्च 1855 रोजी कोलकाता ते आग्रा या पहिल्या टेलिग्राफ सेवेची (first telegraph line) सुरुवात झाली. आजच म्हणजे 24 मार्च रोजी या दोन शहरांदरम्यान सुमारे 800 मैल लांबीची वायर लाइन टाकण्यात आली होती. यानंतर ही तार मुंबईआणि मद्रास येथेही पोहोचली पण त्याआधी टेलिग्रामने बराच प्रवास केला होता. जुलै 2013 मध्ये ही सेवा देशात कायमची बंद करण्यात आली. कारण दळणवळणाच्या अनेक माध्यमांमध्ये तिचा वापर कमी करण्यात आला होता. 


1882: डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा शोध लावला


रॉबर्ट कोच (Robert Koch) यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाला (Tuberculosis TB)कारणीभूत असलेल्या मायकोबॅक्टेरियम या जीवाणूचा शोध लावला. रॉबर्ट कोच हे मायक्रोबायोलॉजी क्षेत्रातील अग्रणी मानले जातात. त्यांनी कॉलरा, अँथ्रॅक्स आणि क्षयरोगावर विस्तृत अभ्यास केला आणि शेवटी सिद्ध केले की अनेक रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात. यासाठी त्यांना 1905 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.


1946: भारतीय स्वातंत्र्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात 


लॉर्ड पेथिक लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश कॅबिनेट मिशन (Cabinet Mission to India) 24 मार्च 1946 रोजी भारतात पोहोचले. 1946 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी तीन सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात पाठवण्याची घोषणा केली. या शिष्टमंडळात ब्रिटिश मंत्रिमंडळातील तीन सदस्य लॉर्ड पेथिक लॉरेन्स (भारत सचिव), सर स्टॅफोर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मिशनला विशेष अधिकार देण्यात आले होते आणि त्याचे कार्य भारताकडे शांततेने सत्ता हस्तांतरित करण्यासाठी मार्ग आणि शक्यता शोधणे हे होते.


दिल्लीत आल्यानंतर 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनने आपला प्रस्ताव सादर केला. त्याच्या प्रमुख शिफारशी खालीलप्रमाणे,  


1. संविधान सभेची निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट होते. 
2. भारताचे विभाजन करणे.
3. संविधान सभेचे सदस्य जनतेकडून अप्रत्यक्षपणे निवडले जाईल.
4. 10 लाख लोकसंख्येवर संविधान सभेचा एक सदस्य निवडला जाईल.


1977: मोरारजी देसाई देशाचे चौथे पंतप्रधान बनले


आणीबाणी हटवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं आणि 24 मार्च 1977 रोजी मोरारजी देसाई (Morarji Desai) भारताचे चौथे पंतप्रधान बनले आणि त्यांनी पहिल्यांदा देशात बिगर-काँग्रेस सरकार स्थापन केले. मोरारजी देसाई हे भारताचे स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि देशाचे चौथे पंतप्रधान (1977 ते 1979) होते. बिगर काँग्रेस पक्षाचे ते पहिले पंतप्रधान होते. ते एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न आणि पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान निशान-ए-पाकिस्तानने सन्मानित करण्यात आलं आहे.


वयाच्या 81 व्या वर्षी ते पंतप्रधान झाले. मोरारजी देसाई मार्च 1977 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले पण त्यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही. चौधरी चरणसिंग यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले.


2020: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा


देशात तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा लॉकडाऊन 21 दिवसांचा असेल असं स्पष्ट करण्यात आलं. देशातील कोरोना बाधितांची संख्या ही 500 च्या वरती गेल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. लॉकडाऊन लावल्यानंतर अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर सर्व सेवा, रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवा बंद करण्यात आल्या.