24 December Headlines : ईशा अंबानी आणि आनंद पिरामल त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात येणार आहेत. त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. तसेच खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीमध्ये पोहचणार आहे. या यात्रेत अभिनेते कमल हसन सहभागी होणार आहेत. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवाला संबोधित करणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे.
ईशा अंबानी जुळ्या बाळासह भारतात येणार
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात येणार आहेत. त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. सकाळी साडेआठ वाजता हे दोघेही व्हीआयपी गेट नंबर आठवर दाखल होतील. कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानानं लॉस अँजलिसवरुन हे मुंबईत येतील. विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असेल. बाळांच्या स्वागतासाठी इशा अंबानीच्या ‘करुणा सिंधू’ निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत येणार आहेत. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहेत. तसेच, अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून पाच अनाथाश्रम सुरु केले जाणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील. बाळांसाठी Hermes, Dior या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचं फर्निचर आणि नर्सरी ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’मध्ये तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी dolce gabbana , Gucci , Loro piana या ब्रँडचे कपडे खास तयार करण्यात आलेत. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे. बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून आठ स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या नॅनी येणार आहेत.
भारत जोडो यात्रा दिल्लीमध्ये -
राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा आज दिल्लीमध्ये प्रवेश करणार आहे. सायंकाळी भारत जोडो यात्रा लाल किल्ल्यावर पोहचणार आहे. दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रामध्ये अभिनेते कमल हसन सहभागी होणार आहेत.
ओम बिर्ला पुणे दौऱ्यावर -
पुणे- लोकसभेतील स्पीकर ओम बिर्ला पुणे दौऱ्यावर. येरवडा भागातील अग्रवाल समाजाच्या कार्यक्रमास हजेरी लावणार, सकाळी ९.४५ वाजता. तर एम आय टी संस्थेतील कार्यक्रमासही उपस्थित राहणार आहेत.
मुंबई- ख्रिसमच्या पार्श्वभूमीवर दादर कार्निवलचं उद्घाटन शर्मिला ठाकरेंच्या हस्ते होणार आहे, सकाळी १० वाजता. रात्री १० पर्यंत हा कार्निव्हल सर्वसामान्यांसाठी खुला असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार एकाच मंचावर -
अमरावती- राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन अमरावतीच्या वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. सामाजिक क्षेत्रातील कामगिरीसाठी सरिता कौशिक यांना पुरस्कार मिळणार आहे. तसेच, कलाक्षेत्रात साधना सरगम, उद्योगक्षेत्रात अहमदनगरच्या श्रध्दा ढवन, क्रिडा क्षेत्रात सातारा येथील अक्षता ढेकळे आणि प्रशासकीय क्षेत्रात अमरावती येथील प्रिती देशमुख यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात असण्याची शक्यता.
हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन -
सांगली- हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. राज्यात लव्ह जिहाद, धर्मातरविरोधी कायदा करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने या हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हिंदुत्ववादी संघटनांसह राजकीय पक्षही सहभागी होणार आहेत.राम मंदिर चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. पंचमुखी मारुती रोड, हरभट रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून स्टेशन चौकात ४ मुलींच्या भाषणाने मोर्चाची सांगता होईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धा -
भंडारा- हिंदवी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. चार गटात होणाऱ्या या स्पर्धेत भंडारा शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील सुमारे ३ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डी वॉर्ड’ कार्यक्षेत्रात ताडदेव महापालिका शाळा, बने कम्पाऊंड, साने गुरूजी मार्ग, ताडदेव येथे शनिवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरामध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण आणि दंत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी सुमारे 1 हजार बालके उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती सुशीबेन शहा यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवाला संबोधित करणार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानची स्थापना राजकोट येथे 1948 मध्ये गुरुदेव शास्त्रीजी महाराज श्री धर्मजीवनदासजी स्वामी यांनी केली. संस्थानच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला असून सध्या जगभरात 40 पेक्षा जास्त शाखा आहेत. संस्थानामार्फत 25,000 हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा पुरवल्या जातात.
अमित शाह गुजरात दौऱ्यावर -
केंद्रीय मंत्री अमित शाह आज गुजरातच्या दौऱ्यावर असतील. सकाळी साडेदहा वाजता ते विविध पिल्वई, मेहसाणा येथील श्री गोवर्धन नाथ मंदिरात दर्शन घेतली. त्यानंतर विविध कामाची पायाभरणी करतील. दुपारी एक वाजता महुडी जैन मंदिराला भेट देणार आहेत.