23rd August Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज बहुप्रतिक्षित भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचं चंद्रावर लँडिंग होणार आहे, तर इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कांद्याच्या वाढीव निर्यात शुल्काविरोधात नाशिकमधील कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशी ठप्प असणार आहे.


अवघ्या काही मिनिटांत चांद्रयान-3चं चंद्रावर लँडिंग


संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रयान 3 चंद्रावर लँड होणार आहे. चांद्रयान–3 चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करणार आहे. चांद्रयान-3 चं लँडर मॉड्यूल चंद्रावर सॉफ्ट लँड करेल. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागापासून 25 किमीवर आहे आणि ताशी 6 हजार किमीवरुन त्याचा वेग शून्यावर आणला जाईल. MOX/ISTRAC वरून चांद्रयान-3 चंद्राच्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण आज संध्याकाळी 5.27 पासून सुरू केलं जाईल. 'सॉफ्ट-लँडिंग'चं थेट प्रक्षेपण ISRO ची वेबसाईट, त्यांचं YouTube चॅनल, ISRO चृं Facebook पेज आणि DD National TV चॅनल यासह अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.


कांद्याच्या वाढीव निर्यात शुल्काविरोधात नाशिकमधील कांदा लिलाव ठप्प


कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प असून सकाळी 10 वाजता केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापारी, शेतकरी प्रतिनिधी, नाफेड आणि सरकारी अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दोन दिवसात जवळपास 45 ते 50 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली बैठक निष्फळ ठरली होती.


इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक


महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे, त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून 23 ऑगस्टच्या बैठकीमध्ये तयारी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. 


भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज ठाकरे गटात प्रवेश


माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित प्रवेश होणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार असणार अशी चर्चा सुरु आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सध्या ते भाजपमध्ये होते, त्यांनी 2019 ला तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. वाकचौरे यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता.