20th July Headlines:  आज दिवसभरात महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा होऊ शकते. त्याशिवाय राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे.  तर, दुसरीकडे आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. विरोधकांनी एकजूट केल्यानंतर हे अधिवेशन होत असल्याने विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 



संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात 


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. आजपासून 11 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 31 विधेयकं सादर केली जाणार आहे. अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या 17 बैठका प्रस्तावित आहे. सकाळी 11 वाजता, जुन्या इमारतीत सभागृहाचे कामकाज सुरु होणार आहे. 


विरोधकांची बैठक, संसदेतील रणनीति ठरवणार 


अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर सकाळी 10 वाजता मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. मणिपूर हिंसाचार आणि पंतप्रधानांच्या वक्तव्याच्या मागणीवर विरोधी पक्ष गदारोळ करण्याची शक्यता आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करावी, काँग्रेस या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे, देशाच्या विविध भागात आलेल्या पुर स्थिती, रेल्वे अपघात, बेरोजगारी आणि महागाई, भारत-चीन सीमेवरील परिस्थिती या विषयांवर चर्चा करण्यासाठी कॉग्रेस आग्रही राहिल.


राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा


राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोकणात पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड आणि पुण्यातील घाट माथ्यासाठी रेड अलर्ट जारी, पालघर, सातारा, पुणे आणि रायगडसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 



विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 


विधानसभेत नियम क्रमांक 293 अन्वेय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. ही चर्चा आज ही सुरु राहणार आहे. या संदर्भात विरोधकांनी बोगस बियाणे आणि खतांच्या वाढती किंमत यावरुन सरकारला धारेवर धरलेलं आहे. सरकारकडून आज या चर्चेला उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने नवीन घोषणा होण्याची शक्यता आहे. 


राज्य मंत्रिमंडळाची बैठक


राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होणार असून या बैठकीत राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच सर्व यंत्रणांना राज्य सरकारने अलर्ट दिला आहे. त्याशिवाय, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकार महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.


अजित पवार गटाकडून आज सत्ताधारी आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज संध्याकाळी सत्ताधारी पक्षातील सर्व आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावतीने जेवणाचं निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी सत्ताधारी पक्षातील सर्व आमदार प्रथमच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत. 
  


जैन समाजाचा मोर्चा


अहमदनगर - कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील दिगंबर जैनाचार्य श्री कामकुमारनंदनजी गुरु महाराज यांची अमानुष हत्या झाल्याच्या निषेधार्थ आणि जैन समाजाच्या इतर प्रश्नांबाबत आज सकल जैन समाज अहमदनगर यांच्यावतीने निषेध मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. 


अमरावती - आचार्य कामकुमार नंदीजी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. राजकमल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.


मातंग समाजाची गोंधळ यात्रा मुंबईत दाखल होणार


राज्यातील मातंग समाज आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून निघालेली मातंग समाजाची गोंधळ यात्रा मुंबईत आझाद मैदानात येणार आहे. आझाद मैदानात ते आपलं गाऱ्हाण  मांडणार आहेत.