20th April Headlines: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज घडणारी खगोलीय घटनादेखील महत्त्वाची आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज सकाळी 07.04 ते 12.29 पर्यंत होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. राज्यातील कृषी बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीसाठी आज शेवटचा दिवस आहे. राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


सूरत, गुजरात


- 2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार? आज कोर्टाचा यावर निर्यण येण्याची शक्यता आहे.
 


मुंबई - 


- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सह्याद्री अतिथीगृह भेट घेणार आहेत. वरळी बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पात काही मागण्या घेऊन मनसेचे कार्यकर्ते आणि रहिवाश्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती त्यानंतर आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट होणार आहे.


- महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेली जीवित आणि वित्त हानी यासंदर्भात संभाजी ब्रिगेड पोलिसात तक्रार अर्ज देत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार आहेत.


- कथित एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. तूर्तास पेडणेकरांना हायकोर्टानं दिलाय अटकेपासून दिलासा.


- हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. साजिद, आबीद आणि नाविद यांना ईडीच्या प्रकरणात अटकेपासून दिलेलं संरक्षणही आज संपणार आहे.


- कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज छगन भुजबळांसह सर्व 52 आरोपी मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याची शक्यता. सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकांवर होणार सुनावणी.


- सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आज मुलुंड कोर्टात होणार का हजर? मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयानं जावेद अख्तर यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे.


 
नाशिक


-  नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे कुठे निवडणूक बिनविरोध होणार कुठे चुरशीची निवडणूक होणार हे आज स्पष्ट होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना भाजप विरोधात महाविकास आघाडी अशी लढत आहे तर पिंपळगाव मध्ये महाविकास आघाडीचे 2 प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटचे माजी आमदार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यांच्यात लढत आहे.


नागपूर 


- ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची खारपान पट्ट्यातील पाणी समस्येसाठी काढलेली पैदल संघर्ष यात्रा आज नागपूरला पोहचणार आहे. 10 एप्रिल अकोल्याच्या राजराजेश्वर मंदिरपासून हि यात्रा सुरु झाली होती. आज नागपुरात दाखल झाल्यावर उद्या अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरपेठ येथील घरासमोर यात्रा जाऊन ते तेथे आंदोलन करणार आहे. नागपूर पोलिसांनी त्यांना आंदोलनाचे स्थळ बदलावे यासाठी नोटीस बजावली आहे. 
 
पुणे 


- पुणे जिल्ह्यातील रांजनगाव एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यात येईल असे राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात जाहीर केले. गुरुवारी उद्योगमंत्री उदय सामंत रांजनगाव एमआयडीसी मध्ये येऊन याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. 


जळगाव 


- बाजार समिती निवडणूक उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आयत्या वेळी घडणाऱ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. माघारीसाठी काही उमेदवारावर दबाव टाकला जात असल्याने वादचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रमुख नेते उमेदवार नाही. मात्र मुक्ताई नगर भुसावळ आणि बोडवाड बाजार समिती एकत्रित निवडणुकीत एकनाथ खडसे आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे दोन्ही पॅनल प्रमुख असल्याने या ठिकाणची निवडणूक ही अर्ज माघारी नंतर चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.


 धुळे/नंदुरबार


- बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस वाढली असून आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी प्रामुख्याने लढत असली तरी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र सुभाष भामरे विरुद्ध कुणाल पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे.
 
नंदुरबार


-  नंदुरबार जिल्हा वंजारी समाजाचा मेळावा देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भागवत कराड राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित उपस्थित राहणार आहेत.