जालना: सासरच्या त्रासाला कंटाळून दोन जावांनी आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्द्र चिंचोली गावात ही घटना घडली.
मुक्ता पोपट बुधनर आणि जयश्री अंगद बुधनर असं आत्महत्या केलेल्या जावांची नावं आहेत. या दोघींनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मुक्ता आणि जयश्री कापूस वेचणीसाठी शेतात गेल्या होत्या. मात्र त्या घरी परतल्या नाहीत. थेट त्यांचे मृतदेह गावातील एका शेतकऱ्याला आढळून आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन तपास सुरु केला. त्यादरम्यान दोन्ही जावांनी सासरच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याचा आरोप, दोन्ही जावांच्या माहेरच्यांनी केला. तशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी मयत महिलांचे पती, सासू, सासरे यांच्यासह सासरच्या 5 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.