2 March Dinvishesh Marathi: शीत युद्धाची समाप्ती करण्याकडे पाऊल टाकून अमेरिकेसोबत चर्चेची भूमिका स्वीकारणाऱ्या आणि रशियाची बंदिस्त अर्थव्यवस्था खुली करण्यावर भर देणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा 2 मार्च 1931 रोजी जन्म झाला. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सरोजिनी नायडू यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. यासह इतिसाहासातील इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,


1498: भारताच्या शोधात निघालेला वास्को द गामा मोझांबिका बेटावर पोहोचला


भारताच्या शोधात निघालेला पोर्तुगिलचा वास्को द गामा 2 मार्च 1498 रोजी आफ्रिकेतील मोझांबिक या बेटावर पोहोचला. कॉन्स्टॅंटिनोपलचा मार्ग बंद झाल्यानंतर युरोपचा भारताची होणारा व्यापार बंद झाला. त्यामुळे युरोपियन लोकांना नवा व्यापारी मार्ग शोधणं आवश्यक झाला. पोर्तुगिजच्या वास्को द गामा या खलाशाने आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताकडे येण्याचा मार्ग शोधला. 


1807: अमेरिकेत गुलामांच्या आयातीवर बंदी घालणारा कायदा संमत


अमेरिकन काँग्रेसने देशात गुलामांच्या आयातीवर बंदी घालणारा कायदा संमत केला. गुलामगिरीच्या समाप्तीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.


1931: सोव्हिएत रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म


रशियात सुधारणांचे वारे सुरु करणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी झाला. गोर्बाचेव्ह हे सोव्हिएत संघाचे सातवे आणि अखेरचे राष्ट्रप्रमुख होते. मार्च 1985 ते ऑगस्ट 1991 दरम्यान गोर्बाचेव सोव्हिएत संघाचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होता. झपाट्याने खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेव्ह यांनी ग्लास्नोस्त आणि पेरेस्त्रोयका ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्याने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले, त्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला.


1949: सरोजिनी नायडू यांचं निधन


2 मार्च 1949 हा दिवस सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) यांची पुण्यतिथी म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे. राजकीय कार्यकर्त्या, महिला हक्कांच्या समर्थक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा, अशी सरोजिनी नायडू यांची ओळख आहे. त्यांना 'भारताची कोकिळा' म्हणून ओळखलं जायचं. 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या सरोजिनी यांनी मद्रास विद्यापीठाव्यतिरिक्त सरोजिनी यांनी किंग्ज कॉलेज, लंडन आणि नंतर गर्टन कॉलेज, केंब्रिज येथे शिक्षण घेतले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. देशाच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या लेखनाचा देशातील विचारवंतांवरही प्रभाव पडला. सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन, 13 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


1969: ब्रिटनच्या पहिल्या सुपरसॉनिक विमानाचे यशस्वी उड्डाण


ब्रिटनच्या सुपरसॉनिक विमान कॉनकॉर्डने पहिले यशस्वी उड्डाण केले. हे विमान ताशी 2080 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकत होतं. 


1970: ऱ्होडेशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केलं


आजच्याच दिवशी ऱ्होडेशियाचे पंतप्रधान इयान स्मिथ यांनी देशाला प्रजासत्ताक घोषित केले आणि ब्रिटीश साम्राज्याशी औपचारिकरित्या स्वातंत्र्य जाहीर केलं.


1991: कोलंबोत स्फोट, संरक्षण उपमंत्र्यांसह 19 जणांचा मृत्यू


श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या कार बॉम्बस्फोटात देशाचे संरक्षण उपमंत्री रंजन विजयरत्ने यांच्यासह एकूण 19 जणांचा मृत्यू झाला.


2008: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, 42 ठार


पाकिस्तानातील डेरा आदमखेलमध्ये, स्थानिक दहशतवाद्यांविरोधात लढा उभा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत झालेल्या बॉम्बस्फोटात 42 लोक ठार आणि 58 जखमी झाले.