चंद्रपूर : मृत वन्यजीवांसोबत फोटो काढण्याचा किळसवाणा प्रकार चंद्रपुरात उघडकीस आलाय. शनिवारी सकाळी भद्रावती येथील डिफेन्स कॉलनीमध्ये दोन बिबट आणि दोन अस्वलांचा मृत्यू झाला होता. या मृत प्राण्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेत. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, वीजेचा झटका देऊन या प्राण्यांची शिकार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आलीय. याबाबत वनविभागाच्या पथकाने तपास सुरु केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळच्या आयुध निर्माणी परिसरातील घनदाट जंगलात चार वन्यजीवांची शिकार झाल्याचे प्रकरण शनिवारी उघडकीस आले होते. दोन बिबटे व दोन अस्वलीचे मृतदेह या जंगलात आढळल्यानंतर वनविभागात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास वेगवान होत असतानाच काही स्थानिक नागरिकांनी या मृत वन्यजीवांसोबत फोटो काढण्याची हौस पूर्ण केल्याचा किळसवाणा प्रकार उजेडात आला आहे. मृत्यू पावलेले वन्यजीव हे शेड्युल एक दर्जाचे संरक्षित वन्यजीव होते. या प्रकरणाचे गांभीर्य समजून न घेता काही स्थानिकांनी मृत वन्यजीवांसोबतचे फोटो काढून ते सोशल मीडियावर वायरल केले. हा प्रकार वन्यजीवप्रेमींच्या लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. जिवंत वीज प्रवाहाचा वापर करून जीव प्राणास मुकले असताना त्या विषयीची संवेदनशीलता न बाळगता सेल्फीची हौस पूर्ण करणाऱ्या फोटोवीरांवर कारवाईची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.


गोव्यातील बोंडला अभयारण्यातून चार बिबट्यांचं पलायन

वीज वाहिनीच्या तारा टाकून शिकार?
या वन्यजीवांची 11 केवी उच्चदाबाच्या वीज वाहिनीच्या तारा टाकून शिकार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय. तसेच या घटनास्थळी इलेक्ट्रीक तारा असलेल्या काही सामग्रीही आढळली आहे. त्यानुसार हे कृत्य करणाऱ्या शिकाऱ्यांनाही अटक होईल, असा विश्वासही वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. आयुध निर्माणी परिसरातील घनदाट जंगलात वन्यजीवांची मोठी वस्ती आहे. हरिण इतर प्राण्यांसह वाघ, बिबटे आणि अस्वल यांचा मुक्त वावर या भागात असतो. हीच गोष्ट लक्षात ठेवून शिकार्‍यांनी सापळा रचला असल्याचे वनधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

Leopard | पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची सुटका | नाशिक | ABP Majha