पणजी : गोव्यातील बोंडला अभयारण्यातून चार बिबट्यांनी पलायन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पळालेल्या चारपैकी तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन खात्याला यश आलं, मात्र एक बिबट्या अद्यापही मोकाट आहे.
बोंडला अभयारण्यात एकूण पाच बिबटे असून त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे. या पिंजऱ्याला जोडूनच बिबट्यांना मुक्त विहारासाठी लोखंडी तारेचं कुंपण घालून जागा आरक्षित करण्यात आली आहे. या पिंजऱ्याचं कुलूप कोणीतरी तोडलं, त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास पाचपैकी चार बिबट्यांनी पलायन केलं.
पळालेल्या बिबट्यांमध्ये एक नर, एक मादी आणि दोन बछडय़ांचा समावेश होता. हा प्रकार पहाटेच्या वेळी गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर फोंडा पोलिसात तक्रार देऊन पंचनामा करण्यात आला.
शोधमोहिमेत चारपैकी तिघे बिबटे अभयारण्य परिसरातच सापडले. त्यांना जेरबंद करुन पुन्हा पिंजऱ्यात ठेवण्यात आलं. एक बिबट्या अद्याप हाती लागलेला नाही. मात्र त्याचा ठावठिकाणा कळल्याचा दावा वनखात्याने केला आहे. या प्रकरणी बोंडला अभयारण्याच्या वनाधिकाऱ्यांनी फोंडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एक बिबटा मोकाट असल्यामुळे शनिवारी अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश बंद करावा लागला. सायंकाळी उशिरापर्यंत हा चौथा बिबटा सापडला नसल्याची माहिती वनखात्याच्या सूत्रांकडून मिळाली. बोंडला अभयारण्यात घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून या प्रकरणी चौकशी होणार आहे.