कोल्हापूर : ग्रामीण भागात आज देखील कुणाच्या घरी दुःखद घटना घडली की, सांत्वनासाठी जाण्याची परंपरा आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात मैत्रिणीच्या सांत्वनासाठी गेलेल्या 19 महिलांना क्वॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे. ही घटना करवीर तालुक्यातील कांचनवाडी या ठिकाणी घडली आहे. आपल्या मैत्रिणीच्या पतीचं निधन झाल्यानंतर 19 महिला चाफोडी याठिकाणी सांत्वनासाठी गेल्या होत्या. मात्र ज्या मैत्रिणीचे सांत्वन करण्यासाठी गेल्या त्या महिलेलाच कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर कांचनवाडी गावात एकच खळबळ उडाली. चार दिवसांपूर्वी संबधित महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर कांचनवाडीतील महिला सांत्वनासाठी गेल्या, मात्र ज्या महिलेचं सांत्वन केले त्या महिलेचाच अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चाफोडी येथील महिला कांचनवाडी इथल्या महिलांसोबक असायची. छोट्या-मोठ्या कामाबरोबर शेतीच्या कामानिमित्त या महिलांचा चांगला ग्रुप तयार झाला होता. एकमेकींच्या दुःखात या सहभागी होत असतं. मात्र कोरोनामुळे सध्याची परिस्थिती वेगळी आहे. असं असताना देखील या महिला मैत्रिणीचे सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी गेल्या. पण ज्या मैत्रिणीच्या सांत्वनासाठी गेल्या ती मैत्रिणच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या सर्व महिलांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. अशातच क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेला धाप लागण्यास सुरुवात झाल्यामुळे इतर महिलांही घाबरून गेल्या आहेत.
सदर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सांत्वनासाठी गेलेल्या सर्व महिलांना आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात ठेवले आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र शहराबाहेर, तसेच ग्रामीण भागातही नागरिक नियम धाब्यावर बसवत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोल्हापूर् जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हजारांच्या पार पोहोचला आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, तसेच तोंडाला मास्क वापरा, अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. परंतु, यासर्व सुचनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
अंत्यसंस्कार किंवा रक्षाविसर्जन याला उपस्थिती लावणे हे परंपरा समजली जाते. रूढी-परंपरा पाळा पण कोरोनाच्या संकटात हे आपल्याला शक्य नाही. शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे नागरिकांनी फोनवरून सांत्वन करणं योग्य ठरेल. सामाजिक भान ठेवून प्रतिष्ठित नागरिकांनी गर्दी टाळावी अशी विनंती शिरोली दुमाला येथील बैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Coronavirus | कर्नाटकात दहावीची परीक्षा दिलेले 32 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागणFil