बेळगाव : कर्नाटकात दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे तर 80 विद्यार्थ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा हॉलमध्ये जाताना विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाय वर्गात सगळीकडे सॅनिटायझेशन करत फवारणी करण्यात आली होती. तसेच कन्टेंन्मेंट झोनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळी करण्यात आली होती. तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Continues below advertisement


सुरुवातीला मार्च महिन्यात होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. परीक्षा होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. कोरोनाचं संकट असताना परीक्षा होणार म्हणून पालक आणि विद्यार्थी यांच्यातही भीतीचे वातावरण होते. परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्याचं वेळापत्रक रद्द करुन आता 25 जून ते 3 जुलै दरम्यान घेण्यात आल्या.


विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य करण्याचा आदेश नुकताच यूजीसीने काढला आहे. यामुळे कोट्यवधी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या जीवाशी सरकार का खेळतंय असा सवाल युवासेनेने उपस्थित केला आहे. आता सर्व काळजी घेऊनही कर्नाटकात दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.