18th July In History: आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. मानवाच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत आपले मोलाचे योगदान देणाऱ्या नेत्यांचे स्मरण करणारा आजचा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी चळवळीचे नेते नेल्सन मंडेला यांचा जन्मदिन आहे. तर, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, श्रमिक-दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतीदिन आहे. 



1918: नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा जन्म


दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी लढ्यातील अग्रणी नेते, दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा आज जन्मदिन. देशातील परिस्थिती पाहून नेल्सन मंडेला 1941 मध्ये जोहान्सबर्गला गेले. जेथे ते वॉल्टर सिसुलू आणि वॉल्टर अल्बर्टाइन यांना भेटले, ज्यांच्या प्रभावाने त्यांनी देशातील रंगाच्या आधारावर भेदभाव दूर करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. देशहिताचा लढा सुरू असतानाच ते हळूहळू राजकारणात सक्रिय झाले. 1944 मध्ये, ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले, जे वर्णभेदाविरुद्ध आंदोलन करत होते. त्याच वर्षी त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लीगची स्थापना केली. पुढे ते त्याच संघटनेचे सचिव म्हणून निवडले गेले. 1961 मध्ये नेल्सन मंडेला आणि त्यांच्या काही मित्रांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला पण त्यात ते निर्दोष असल्याचे आढळले. 5 ऑगस्ट 1962 रोजी अटक झाल्यानंतर प्रसिद्ध ‘रिव्होनिया’ खटल्यात 1964 मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. साडेसातवीस वर्षांचा तुरुंगवासही त्यांचा वर्णद्वेषाविरोधी लढ्याच्या निर्धाराला कमकुवत करू शकला नाही. 27 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर मडेला यांची अखेर 11 फेब्रुवारी 1990 रोजी सुटका झाली.


मंडेला यांना त्यांच्या राजकीय कामगिरीबद्दल 250 हून अधिक पुरस्कार, प्रशंसा, बक्षिसे, मानद पदवी आणि नागरिकत्व देण्यात आले. 1993 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार नेल्सन मंडेला यांना प्रदान करण्यात आला. संयुक्त राष्ट्राने 2010 पासून मंडेला यांच्या 92 व्या वाढदिवसापासून 'आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन' साजरा करण्यास सुरुवात केली.


1927:  पाकिस्तानी गझल गायक मेहदी हसन यांचा जन्म


आपल्या जादूई आवाजाने मेहदी हसन यांनी पाकिस्तानसह भारत आणि जगभरातील संगीतप्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले होते. "गझलसम्राट" म्हणून ते प्रसिद्ध आहे. 1979 मध्ये भारत सरकारने त्यांना के. एल. सेहगल संगीत शहेनशहा पुरस्कार दिला होता. लता मंगेशकर यांनाही मेहंदीच्या आवाजातील गाणी "ईश्वरी आवाजासारखी" वाटत असत. 


गझल गायनाला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय हसन यांना जाते. त्याच्या सुरेल नमुने आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने रागांची अखंडता राखण्यासाठी तो अद्वितीय आहे.


कलावंत संगीतकारांच्या कुटुंबात जन्मलेल्या हसन यांचा लहानपणापासूनच संगीताकडे कल होता. त्यांनी जगजीत सिंग ते परवेझ मेहदीपर्यंत विविध शैलीतील गायकांच्या पिढ्यांवर प्रभाव टाकला. त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांसाठी गायन केले. कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल, हसन यांना पाकिस्तान सरकारने निशान-ए-इम्तियाज, तमघा-ए-इम्तियाज, प्राईड ऑफ परफॉर्मन्स आणि हिलाल-ए-इम्तियाजने सन्मानित केले.



1969: लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे निधन 


जाती व्यवस्थेच्या चटक्याने ज्यांना अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले. पण, आपल्या लेखणीतून कष्टकरी, सर्वाहारा, उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे आजच्या दिवशी निधन झाले. अण्णाभाऊ 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईतील कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्त्वात सुरू असणाऱ्या चळवळीकडे अण्णाभाऊ आकर्षित झाले आणि पक्षाचे काम सुरू केले. कम्युनिस्ट पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित केले. त्याच्या परिणामी अण्णाभाऊ यांनी शिक्षण घेतले. त्यातून त्यांनी आपल्या सभोवतालचे वास्तव आपल्या लेखणीतून मांडले. 


1942  च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर अटक वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना 1947 साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.


अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ  हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉम्रेड अमर शेख आणि लाल बावटा कलापथकाद्वारे त्यांनी प्रबोधनाचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. 


पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ऐतिहासिक वक्तव्य त्यांनी 1958 च्या दलित साहित्य संमेलनात काढले होते. मुंबईची लावणी, माझी मैना गावावर राहिली..आदी पोवाडे त्यांचे चांगलेच गाजले. 


इंडियन पीपल्स थिएटर अर्थात इप्टा या सांस्कृतिक संघटनेत अण्णाभाऊ सक्रिय होते. या इप्टामध्ये बलराज सहानी आणि इतर अभिनेते सक्रीय होते. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (1960), चिरानगरची भुतं (1978), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत. तर, फकिरा (1959),  वारणेचा वाघ (1968), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (1963), वैजयंता ह्यांसारख्या 35 कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे.  माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे प्रवासवर्णन ही गाजले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या 7 कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झाली. 



इतर महत्त्वाच्या घटना: 


1852 : इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
1857: मुंबई विद्यापीठाची स्थापना.
1968: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.
1980: भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
1971: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.
1982: अभिनेत्री आणि 'मिस वर्ल्ड 2000' विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म.
2001: सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.
2012: चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे निधन.