पुणे : पोलीस संरक्षणात असलेल्या शासकीय इमारतीदेखील सुरक्षित नसल्याची बाब अधोरेखित करणारी घटना बारामतीमध्ये घडली आहे. काल (मंगळवारी)रात्री बारामती नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील तिजोरी फोडून जवळपास 17 लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.


बारामतीमधल्या भिगवण चौकात असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीत काल रात्री चोरट्यांनी प्रवेश केला. चोरांनी तिजोरी फोडून 17 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सर्वप्रथम पालिकेच्या मुख्य इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

VIDEO | बारामती नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील तिजोरी फोडली, 17 लाख रुपयांची रोकड लंपास | एबीपी माझा



मुख्य चौकात, पोलीस संरक्षणासह सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीत चोरी होतेच कशी? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच चोरांना पालिकेच्या इमारतीची, कार्यालयाची संपूर्ण माहिती कशी काय मिळाली? असा प्रश्नदेखील लोकांना पडला आहे.