नवी दिल्ली : मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील 17 शहरातील हवा आरोग्यासाठी हानीकारक आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित 94 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश झाला आहे.


या 17 शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळाने 2011 ते 2015 या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात राज्यातील 17 शहरातील हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’ या प्रदूषित घटकाचं प्रमाण निश्चित पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरात ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’ सह नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) या घटकाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे.

केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’ चं वार्षिक सरासरी प्रमाण 60 आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचं वार्षिक सरासरी प्रमाण 40 पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहर म्हटलं जातं.

राज्यातील या शहरांतील हवा धोकादायक

  1. मुंबई

  2. नागपूर

  3. नवी मुंबई

  4. उल्हासनगर

  5. बदलापूर

  6. पुणे

  7. नाशिक

  8. औरंगाबाद

  9. जालना

  10. लातूर

  11. कोल्हापूर

  12. सांगली

  13. सोलापूर

  14. अकोला

  15. अमरावती

  16. चंद्रपूर

  17. जळगाव


महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा नंबर

महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेशचा नंबर लागला आहे. कारण उत्तर प्रदेशातील पंधरा शहरं सर्वाधिक प्रदूषित आहेत. तर पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे. गुजरातमधील सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातील चार आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरं प्रदूषित आहेत.