16th June In History: आजच्या दिवशी इतिहासात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्या दिवशी ब्रिटिशांनी राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली. तर, भारतात रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे रसायनशास्त्रज्ञ प्रफुलचंद्र रे यांचा आज स्मृतीदिन आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवसही आहे. आजच्या दिवशी 2013 मध्ये त्सुनामीनंतरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली. 



1914: मंडालेच्या तुरुंगातून लोकमान्य टिळकांची मुक्तता


काँग्रेसमधील जहाल गटाचे नेतृत्व करणारे, राष्ट्रवाद, स्वराज्याचे पुरस्कर्ते  लोकमान्य टिळकांवर 1897 आणि 1908 मध्ये असे दोन वेळेस राजद्रोहाचे खटले चालवण्यात आले आहे. 1906 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. 1908 मध्ये त्यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मंडालेच्या या कारावासात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. 1914 मध्ये कारावासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली. 


1920: गायक, संगीतकार आणि निर्माते हेमंत कुमार यांचा जन्म


हेमंत मुखोपाध्याय हे एक सुप्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार व निर्माता होते. हिंदी क्षेत्रात ते हेमंत कुमार आणि हेमंत मुखर्जी या नावांनी प्रसिद्ध होते. 


हेमंतदांचा जन्म 16 जून 1920 ह्या दिवशी वाराणसी येथे झाला. त्यांचे बालपण बंगालमधील एका खेड्यात गेले. त्याकाळी खेड्यात होत असलेली नाटके पहात आणि लोकसंगीत ऐकत हेमंतदा मोठे झाले, पण संगीताचे औपचारिक शिक्षण हेमंतदांना मिळाले नाही. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना 1935 साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले.


1940 साली 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर 1944  साठी 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन हेमंतदांचा चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. पैकी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी 1945 सालच्या पूर्बोरंग ह्या बंगाली तर 1952 सालच्या आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. 


हेमंतदांनी गाईलेली मोजकी मराठी गाणी लोकप्रिय झाली. ’हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटातील ’गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, लता मंगेशकर ह्यांच्याबरोबरचे ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही हेमंतदांनी गायलेली लोकप्रिय गाणी आहेत. 


1970 निमंत्रण चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निर्माता म्हणून मिळाला. 1984  ललान फकिर चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 


1936: प्रसिद्ध ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ शहरयार यांचा जन्म


शहरयार यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातील मुस्लिम राजपूत कुटुंबात झाला. एक अतिशय जाणकार आणि अभ्यासू कवी म्हणून परिचित आहेत. अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार हे उर्दू कवी, हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार, प्राध्यापक होते. गमन, उमराव जान या हिंदी चित्रपटांतील उर्दू गीतरचनांमुळे गीतकार म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 2008 साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते चौथे मुस्लिम साहित्यिक होते. 


1950:  अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म


अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, माजी खासदार मिथुन चक्रवर्ती यांचा आज जन्मदिवस. मिथुन चक्रवर्ती यांनी मृगया या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1980 च्या दशकातील काळ हा त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा महत्त्वाचा काळ आहे. या कालावधीत मिथुन यांनी एक डान्सिंग स्टार म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि स्वतःला भारतातील सर्वात लोकप्रिय प्रमुख कलाकारांपैकी एक म्हणून स्थापित केले. 1982 च्या ब्लॉकबस्टर डिस्को डान्सरमध्ये स्ट्रीट डान्सर जिमी या भूमिकेने मिथुन यांना चांगलेच लोकप्रिय केले. 1980 च्या दशकात अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय कलाकार होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय बंगाली, भोजपुरी, ओडिया आदी भाषांतील चित्रपटात काम केले आहे. 


1944: भारतीय रसायनशास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन


डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' ही भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापन केली. 1882 साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक विज्ञान हा  मुख्य विषय घेऊन त्यांनी बीए पदवी मिळवली. त्यानंतर ब्रिटनमध्ये एडिन्बरा विद्यापीठात प्रवेश घेतला. 1886 साली त्यांनी बी.एस्सी पदवी, तर 1887 साली डी.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केले.1889 साली ते भारतात परतले व कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी 1916 सालापर्यंत शिकवले. 


1893 साली त्यांनी स्वतःचे भांडवल ओतून बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स वर्क्स हा रसायननिर्मिती उद्योग स्थापला. भारतातील रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ या कारखान्याने रोवली गेली, असे म्हटले जाते. 1896 मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत. 


2013: उत्तराखंड ढगफुटी, 5000 हून अधिकजणांचा मृत्यू


जून 2013 मध्ये, उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले. 2004 च्या सुनामीनंतर ही देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती बनली. त्या महिन्यात झालेला पाऊस हा राज्यात सामान्यपणे पडणाऱ्या पावसापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. 16 जून 2013 रोजी उत्तराखंडमध्ये पूर आला. या पुरात हजारो घरे, बांधकामं वाहून गेली. पूर आणि भूस्खलनामुळे नागरिकांचे हाल झाले. 


गौरीकुंड आणि केदारनाथसाठी महत्त्वाचे असलेले राम बडा या बाजार शहरासारखी संपूर्ण गावे आणि वसाहती नष्ट करण्यात आल्या होत्या, तर सोनप्रयाग या बाजारपेठेचे मोठे नुकसान आणि जीवितहानी झाली होती. 16 जुलै 2013 पर्यंत, उत्तराखंड सरकारने  दिलेल्या आकडेवारीनुसार, 5,700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.  पूल आणि रस्ते उध्वस्त झाल्यामुळे सुमारे 300,000 यात्रेकरू आणि पर्यटक खोऱ्यात अडकले. भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलाने पूरग्रस्त भागातून एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. 


उत्तराखंडमध्ये वाहून गेलेल्या लोकांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील बिजनौर, अलाहाबाद आणि बुलंदशहर सारख्या दूरच्या ठिकाणी सापडले. 21 जून 2013 पर्यंत गंगा नदीवरील हरिद्वार या हिंदू तीर्थक्षेत्रातील बचावकर्त्यांनी पूरग्रस्त नद्यांमध्ये वाहून गेलेल्या 40 बळींचे मृतदेह बाहेर काढले. उत्तराखंडमध्ये वाहून गेलेल्या लोकांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील बिजनौर, अलाहाबाद आणि बुलंदशहर सारख्या दूरच्या ठिकाणी सापडले. केदार खोऱ्यात जूनच्या अत्यंत नैसर्गिक प्रकोपात मरण पावलेल्या मृतदेहांचा शोध अनेक महिने सुरूच होता आणि अगदी सप्टेंबर 2013 पर्यंत जवळपास 556 मृतदेह सापडले त्यापैकी 166 मृतदेह हे चौथ्या फेरीच्या शोध मोहिमेदरम्यान अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. 



>> इतर महत्त्वाच्या घटना : 


1903: फोर्ड मोटर कंपनीची स्थापना 
1977: श्रीपाद गोविंद नेवरेकर - मराठी रंगभूमीवरील गायक-नट यांचे निधन
1995: माई मंगेशकर - मंगेशकरांच्या मातोश्रींचे निधन
1994: अभिनेत्री-गायिका आर्या आंबेकर हिचा वाढदिवस