चंद्रपूर : देशभरात काही विशेष रेल्वे सुरु करत केंद्राने मजुरांना दिलासा दिला आहे. मात्र गावाकडं जाण्याची आस लागलेले मजूर यामुळं मोठ्या प्रमाणार बाहेर पडू लागलेत. चंद्रपुरात 1500 बांधकाम मजुरांनी रस्त्यावर ठिय्या मांडला असल्याचं दिसून आलं. चंद्रपूरच्या निर्माणाधिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळीउत्तर प्रदेश, बिहार, बंगालचे मजूर कामासाठी आले आहेत. शापोरजी-पालनजी कंपनीकडे या बांधकामाचे कंत्राट आहेत. लॉकडाऊन दरम्यान हे काम बंद आहे. मात्र कंपनीने या मजुरांना मजुरी तसंच रेशन काहीही दिलेलं नाही. यामुळं संतापलेल्या कामगारांनी काही काळासाठी महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. 'आम्हाला गावाला जाऊ द्या' असं म्हणत मजूर रस्त्यावर उतरले. पोलीस प्रशासन तसेच तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होत संयमाने स्थिती हाताळली.

चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या बल्लारपूर येथून मजूर स्पेशल रेल्वे गाडी बिहार, झारखंडच्या दिशेने रवाना होण्याच्या 12 तासांच्या आतच त्याचे वेगळे परिणाम दिसू लागले आहेत. या रेल्वेस्थानकापासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामस्थळी कामावर असलेले मजूर अचानक महामार्गावर येऊन आंदोलन करू लागले.

चंद्रपूर -बल्लारपूर वळण मार्गावर ही नवी इमारत होऊ घातली आहे. बांधकाम कंपनी शापूरजी -पालनजी यांच्याकडे बांधकामाचे कंत्राट आहे. इथले बांधकाम दीड महिन्यांपासून बंद आहे. मात्र इथला मजूर वर्ग काम नसल्याने व मजुरी मिळत नसल्याने संतापला आहे. सोबतच कंपनीने आश्‍वासन दिलेले रेशन देखील अदा झाले नसल्याने या संतापात भर पडली. आज सुमारे पंधराशे बांधकाम मजूर अचानक चंद्रपूर- हैदराबाद महामार्गावर आले व त्यांनी काही काळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.



घटनास्थळी तातडीने पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले. सोबतच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी देखील मजुरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दीड महिन्यात कंपनीतर्फे केवळ आश्वासने दिली गेली आहेत त्यामुळे आमच्या गावी जाण्यासाठी आम्हाला मुभा द्या अशी मागणी या कामगारांनी केली आहे. काम नाही, मजुरी नाही,- रेशन नाही यापेक्षा गावाकडे कुटुंबासोबत राहू असं मजुरांचं म्हणणं आहे.

दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या प्रतिनिधींनी सोबत बैठक घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. देश व राज्यातील मजूर लॉकडाऊन झाल्यानंतर जैसे थे परिस्थितीत होते. मात्र लॉकडाऊन- 3 च्या प्रारंभी मजूर स्पेशल रेल्वे गाडी धावू लागल्याने या मजुरांना आता पुढे नवा पर्याय दिसू लागला आहे. यामुळे अचानक ही परिस्थिती उद्भवली. चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात आता या सर्व कामगार व प्रशासनाची एक बैठक होणार असून त्यात यासंबंधी तोडगा अपेक्षित आहे. एवढ्या मोठ्या संख्येत कामगार अचानक रस्त्यावर आल्याने बिकट परिस्थिती उद्भवली होती. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत संयमाने स्थिती हाताळली.