गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवणी या गावात नवरात्रौत्सवादरम्यान एक अनोखी परंपरा गेल्या 150 हून अधिक वर्षांपासून जपली जातेय. खेडशिवणी गावातील या परंपरेनुसार 16 मंडळं एकत्र येतात आणि मातेचा अखंडपणे गजर केला जातो. यंदा 168 तास भजन सोहळा उत्साहात पार पडला. भक्तीसह सर्वधर्म समभावाचा संदेशही या माध्यमातून दिला जातो.


दरवर्षी खेडशिवणी गावातील प्राचीन हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी मंदिरात ज्योत प्रज्वलित करुन हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो. तर घटस्थापनेच्या दिवसापासून तर ज्योती विसर्जनपर्यंत विविध भजन मंडळांतर्फे कुठलेही खंड न पडता दिवस रात्र येथे भजन गायलं जातं.

या ठिकाणी 16 भजन मंडळ असून प्रत्येक भजन मंडळाला भजनासाठी दीड तासांचा अवधी दिला जातो. त्या भजन मंडळाचा अवधी संपताच, खंड न पडू देता दुसरे भजन मंडळ आपले भजन गाण्यास सुरुवात करतं. असे एकूण सात दिवसात तब्बल 168 तास भजन होतं.


16 भजनी मंडळांचा माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून या गावात अनोखी परंपरा सुरु असून, या सप्ताहादरम्यान गावातील वातावरण भक्तीमय होत असते. शिवाय गावात अन्य ठिकाणी कुठलीही पूजाअर्चना होत नाही. या उत्सवात गावातील महिलावर्ग मोठ्या हिरिरीने भाग घेत गावात स्वच्छता करुन रांगोळी काढून मंदिर परिसराची सजावट करत असतात.

भजन मंडळांचे मंदिरातील भजन आटोपल्यानंतर गावातील प्रत्येक गल्लोगल्लीतून हे भजन मंडळ फिरुन या भक्तीमय वातावरणात आणखीच भर पाडीत असतात. त्यामुळे ही परंपरा अशीच पिढ्यांपिढ्या अशीच सुरु राहावी, अशी भावना या गावकऱ्यांची आहे.